Adway Hire, Avishkar Bhuse & Dharati Devre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule Loksabha; शिवसेनेच्या मतांची वजावट हीच भाजपची डोकेदुखी!

अद्वय हिरे, धरती देवरे, अविष्कार भुसे यांसह नेत्यांची दुसरी पिढी लोकसभेच्या मैदानात चुरस वाढवणार

Sampat Devgire

धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघात मुस्लीम (Muslims) मतदारांचा प्रभाव, तर मराठा (Maratha) मतदार निर्णायक आहेत. यंदा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध भाजप (BJP) या लढतीत धर्मनिरपेक्ष मतांना शेज लावून `एमआयएम` (AIMIM) भाजपचा विजय सोपा करतो की, शिवसेना (Shivsena) आपली मते वजा करून महाविकास आघाडीचा झेंडा फडकवतो या दिशेने निवडणूक पुढे जाईल. यात मराठा कार्ड निर्णायक असल्याने भाजप व आघाडी दोघांनाही उमेदवारासाठी उसनवारी करावी लागण्याची चिन्हे आहेत. अशा क्लिष्ट राजकारणात धुळ्याची निवडणूक फिरत राहील. (Shivsena & AIMIM will decide Dhule constituency election Result)

धुळे मतदारसंघात भाजपचा सेव्हंटी प्लस नेत्यांना उमेदवारी नाही हा निकष विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अमरीश पटेल यांच्या उमेदवारीत अडथळा आहे. दुसरीकडे आघाडीकडे प्रबळ उमेदवाराची चणचण असल्याने दोन्हींकडून उमेदवारांची पळवापळवी होऊ शकते. त्यात उमेदवार म्हणून धरती देवरे (भाजप), अद्वय हिरे (शिवसेना), अविष्कार भुसे (शिंदे गट), आमदार कुणाल पाटील (काँग्रेस) आणि ऐनवेळी पार्थ अजित पवार यांची घेतली जात आहेत. ही सर्व हाय प्रोफाईल नेत्यांची दुसरी पिढी आहे. त्यांची उमेदवारी मतदारसंघात रंगत आणू शकते.

या मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा निवडून आले. 2019 मध्ये डॉ. भामरे यांना 6,13,533 (56.54 टक्के), काँग्रेसचे कुणाल पाटील यांना 3,84,290 (35.42 टक्के) मते मिळाली. उर्वरीत सोळा उमेदवारांची अनामत जप्त झाली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नबी अहमद दुल्ला 39,449 हे प्रमुख उमेदवार होते. या मतदारसंघात प्रतापदादा सोनवणे (2009) आणि विद्यमान खासदार डॉ. भामरे 2014 आणि 2019 असे सलग तीन वेळा भाजपकडे हा मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात 55 टक्के ग्रामीण आणि 45 टक्के शहरी आणि धुळे व मालेगाव या दोन महापालिकांचा समावेष असलेला भाग आहे. येथील सहा पैकी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेष आहे. यामध्ये मालेगाव बाह्य- बंदरे विकास मंत्री दादा भुसे (एकनाथ शिंदे गट), मालेगाव शहर- मौलाना मुफ्ती (एमआयएम), बागलाण दिलीप बोरसे (भाजप), धुळे शहर- फारूक शाह (एमआयएम), धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस) आणि शिंदखेडा- माजी मंत्री जयकुमार रावल (भाजप) आहेत.

रेश्मा भोये कोण आहेत?

गेल्या दहा निवडणुकांचा कल लक्षात घेतल्यास हा मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल राहिला आहे. मतदारांवर त्याचा एव्हढा पगडा होता की, अनेकदा खासदार राहिलेले रेश्मा भोये महिला की पुरूष हे देखील मतदारांना माहिती नसायचे. प्रचारात त्याची चर्चा असे. रेश्मा भोये (1980, 1984 आणि 1989), बापु चौरे (1991 आणि 2004), डी. एस. अहिरे (1998) हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

मतविभाजन भाजपच्या पत्थ्यावर

भाजपचे साहेबराव बागूल 1996 मध्ये पहिल्यांदा येथून विजयी झाले, त्याला जनता दलाच्या मतविभागणीचा फायदा झाला. असा फायदा भाजपचे 1999 मध्ये रामदास गावित, 2009 मध्ये सोनवणे यांना झाला. जनता दलाचे निहाल अहमद यांनी उमेदवारी केल्याने मालेगाव शहरातील मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. तेव्हापासून सातत्याने मालेगाव शहराने वेगळी वाट धरून काँग्रेसचा पराभव करीत येथे भाजपला येथे लाभ झाला.

यंदा अॅन्टीइनकमबन्सीची हवा

सलग तीन वेळा येथे भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्याला विविध कारण आहेत. या मतदारसंघात विकास काय झाला? हा प्रचारात फक्त सभांमधील भाषणाचा विषय असतो. प्रत्यक्षात उमेदवाराचा चेहरा महत्त्वाचा ठरतो. या मतदारसंघातून नऊ राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यांच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय धोरणातून झाला. त्यासाठी हजारो कोटींचा खर्च `बीओटी` द्वारे झाला. विद्यमान खासदार त्याचा वारंवरा उल्लेख करतात. याशिवाय मनमाड-नरडाना- इंदूर रेल्वेला मिळालेली मंजुरी आहे. सध्या या रेल्वेचे बारेकुंड ते नरडाना भागात काही कामे सुरु आहेत. बागलाण येथील सिंचनाची कामे मार्गी लागली आहेत.

मालेगाव शहर व बाह्य ही दोन्ही मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत. शहरातील माजी आमदार रशीद शेख व त्यांचे कुटूंब काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहे. त्यामुळे शहरातील 80 ते 85 टक्के भाजप विरोधात असतात. यंदाही तेच असेल. त्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेना यातील महत्त्वाचा वाटा घेतील, ती भाजपची अडचण ठरेल. बाह्य मतदारसंघात शिवसेनेत ठाकरे विरूद्ध शिंदे गट अर्थात अद्वय हिरे विरूद्ध मंत्री भुसे असे चित्र असेल. भुसे स्वतः उमेदवार नसल्याने त्यातील प्रमुख हिस्सा शिवसेना अर्थात महाविकास आघाडी घेऊ शकेल. बागलाण तालुक्यात हेच चित्र भाजप विरूद्ध राष्ट्रवादी राहील. त्यात आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण अशी लढत असेल. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका ठरेल.

भाजपने यंदा सत्तर वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना उमेदवारी नाही अशी घोषणा केली आहे. त्यात विद्यमान खासदार डॉ. भामरे आणि दुसरे इच्छुक अमरीशभाई पटेल या दोघांचीही अडचण होऊ शकते. अशा स्थितीत जयकुमार रावल, गुजरातचे नेते सी. आर. पाटील यांची कन्या व जिल्हा परिषद सदस्या धऱती देवरे, अथवा काँग्रेसकडून आयात केलेला उमेदवार असु शकतो.

शेवटी निवडणुकीचा निकाल काय असेल हा सर्वात गंभीर प्रश्न. त्याचे उत्तर असे की, धुळे मतदारसंघात 6.80 लाख मराठा-पाटील तर 2.80 लाख मुस्लीम मतदार आहेत. सध्या मालेगाव व धुळे शहरांत एमआयएम कडून जोरदार समन्वयाचे काम सुरु आहे. हा धर्मनिरपेक्ष विचारधारेला हा गंभीर संकेत आहे. तसे झाल्यास हिंदू-मुस्लीम धृविकरण होऊन त्याचा थेट लाभ भाजपला व्हावा असे पडद्यामागूनच्या प्रयत्नांचा तो भाग आहे. दुसरा संकेत म्हणजे धुळे ग्रामीण मतदारसंघात लोकसभेला कृणाल पाटील पिछाडीवर तर विधानसभेला आघाडीवर होते. अमरीश पटेल उमेदवार असताना त्यांना 1.11 लाख तर मुस्लीम उमेदवाराला 1.04 मते मिळाली होती. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीला एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम हे गणित मतदारांच्या गळी उतरवावे लागेल. अविष्कार भुसे यांनी याआधीच प्रचार सुरु केला आहे. ते कोणाचे उमेदवार?. भाजपमध्ये जाण्यास ते बाशिंग बांधून बसले आहेत. अशा स्थितीत धुळे ग्रामीण व बागलाण हे मतदारसंघ निवडणुकीचा निकाल काय असेल हे ठरवतील असे सोपे गणित आहे.

एकंदर धुळे मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत राजकारणातील नेत्यांची जनरेसऩ नेक्स्ट उमेदवारीसाठी अधिक चर्चेत आहे. यामध्ये सी. आर. पाटील यांची कन्या धऱती देवरे (भाजप), बंदरे विकास मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे (शिंदे गट), रोहिदास दाजी पाटील यांचे चिरंजीव आमदार कुणाल पाटील (काँग्रेस), प्रशांत हिरे यांचे पणतू अद्वय हिरे (शिवसेना) यांची नावे चर्चेत आहेत. नेत्यांची दुसरी पिढी काय चमत्कार घडवते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT