BJP Leader Vyanktesh More & Rakesh koshti Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime News: खूनाच्या खटल्यात भाजपच्या दोन नेत्यांना जन्मठेप!

Sampat Devgire

BJP MLA Crime News: येथील हनुमानवाडी परिसरात क्रांती चौकामध्ये भेळविक्रेता सुनील वाघ याचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सराईत गुंड कुंदन परदेशी यास जन्मठेपेची तर खुनाच्या कटातील भाजपच्या दोन स्थानिक नेत्यांसह चौघांना सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. (BJP local leader found guilty in a murder case of local vendor in Nashik)

दरम्यान या खटल्यात शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena) नेत्याचा भाऊ अजय बागूल याला खुनाचा कट (Crime) केल्याच्या खटल्यात सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आले. भाजपच्या (BJP) माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि राकेश कोष्टी यांना शिक्षा झाली. स्थानिक (Nashik) राजकीय वर्चस्वाच्या वादातून भेळ विक्रेच्याचा खून केला होता.

त्याचप्रमाणे, खुनाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातील अजय बागूलसह दहा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, न्यायालयाने सरकारी पंचांसह १५ फितूर झालेल्या साक्षीदारांविरोधात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी रीतसर कारवाईचे आदेशही दिले आहेत.

सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. व्ही. वाघ यांच्यासमोर चालला. यात प्रत्यक्ष साक्षीपुराव्यांनुसार न्या. वाघ यांनी मुख्य आरोपी कुंदन सुरेश परदेशी (वय २४) यास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर, प्राणघातक हल्ल्याप्रकरणी राकेश तुकाराम कोष्टी (३०), जयेश हिरामण दिवे (२६), व्यंकटेश नानासाहेब मोरे (२८), किरण दिनेश नागरे (३५), अक्षय कैलास इंगळे (२१), रवींद्र दगडूसिंग परदेशी (५२) यांना प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. मारहाणीच्या गुन्ह्यात अक्षय कैलास इंगळे (२१), रवींद्र दगडूसिंग परदेशी (५२) यांच्यासह गणेश कालेकर (२५) यास प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. पंकज चंद्रकोर यांनी सरकारी पक्षातर्फे ३४ साक्षीदार तपासले. यातील १५ साक्षीदार फितूर झाले. याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हवालदार एम. एम. पिंगळे, गणेश निंबाळकर, एस. एन. जगताप, के. पी. महाले, तनजीम खान यांनी पैरवी अधिकारी म्हणून पाठपुरावा केला.

क्रांती चौकात सुनील वाघ, हेमंत वाघ आणि मंदा वाघ यांचा भेळव्रिकीचा गाडा होता. २७ मे २०१६ ला सायंकाळी सातच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कुरापतीतून आरोपींनी वाघ बंधूंवर हल्ला चढविला. यात सुनील वाघ यांचा खून झाला होता, तर हेमंत वाघ गंभीररीत्या जखमी होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांत परदेशी टोळीतील २१ जणांविरोधात खून, प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तिघे विधिसंघर्षिक बालकांचा समावेश होता. याप्रकरणात तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये परदेशी टोळीविरोधात मोक्काही लावण्यात आला होता. मात्र नंतर मोक्का रद्द झाला होता.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल, उपनिरीक्षक आर. एस. नरोटे, उपनिरीक्षक बी. बी. पालकर, सहाय्यक निरीक्षक ए. एम. मेश्राम यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT