Ahmednagar News : मतदानाच्या आदल्या दिवशी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले. पारनेरमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडे पैसे सापडले, तर नगर शहरात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी एकमेकांना भिडले. यातून मतदानाच्या दिवशी आज काहीसे तणावाचे वातावरण होते. नगर दक्षिणमध्ये संथ गतीने, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. नगर दक्षिणमध्ये प्रशासकीय यंत्रणेचा सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर झाल्याचा तर, काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे मतदारांकडून सकाळच्या सत्रात आरोप झाले. (Latest Marathi News)
नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नगर दक्षिणमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार नीलेश लंके, तर शिर्डीमध्ये महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि वंचित बहुज आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांच्यात थेट लढत होत आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहरासह सर्वच भागात संथगतीने मतदान होत आहे. मतदानाच्या अदल्या रात्री पारनेरमध्ये भाजपच्या एका पदाधिऱ्यांकडे पैसे आढळले. याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या भाचे अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी फिर्याद दिली आहे. भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, सचिन मच्छिंद्र वराळ आणि माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्यासह 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे विना क्रमाकांच्या वाहनातून पैसे वाटप फिरत होता. त्याचा पाठलाग केला असताना, वडझिरे (ता. पारनेर) येथे त्याचे वाहन पाठलाग करून पकडले. तिथे एकाला पैसे देताना दिसला. मोबाईलमधील कॅमेऱ्यात शुटींग केले. हे लक्षात आल्यावर राहुल शिंदे याने त्याच्या वाहनातील काळ्या रंगाची बॅग अंगावर फेकली. यातून पाचशे रुपयांचे बंडल रस्त्यावर पडले. "हे प्रकरण इथेच मिटव. नाहीतर तुला जड जाईल, हे पैसे तुला ठेव आणि तुला अजून किती पैसे पाहिजे ते सांग. हा विषय इथल्या इथं संपवून जाईल", असे म्हणत राहुल शिंदे याने मारहाण केल्याचे अनिल गंधाक्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
हा गोंधळ सुरू असताना तिथे सचिन मच्छिंद्र वराळ आणि विजय सदाशिव औटी कार्यकर्त्यांना घेऊन आले. विजय सदाशिव औटी यांनी लोखंडी राॅडने माराहण केली. यावेळी चुलती वर्षा पांडुरंग गंधाक्ते यांनी मध्यस्थी केली असताना, त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांचे मंगळसूत्र तोडून घेतल्याचे अनिल गंधाक्ते यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
पाथर्डी येथील घुमटवाडी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सत्ताधारी उमेदवाराचे प्रचार पत्र केंद्रावर आढळले. तसे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हा प्रकार उघडकीस आणून शुटींग घेत आरोप केले. कर्जत तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला साईराज लांडगे याचे बोगस मतदान झाले. संबंधित व्होटरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याशिवाय कर्जतमधील बहिरूबावाडी येथील शेतकरी रामदास लाळगे यांनी मतदान केंद्रावर गळ्यात कांद्याची माळ आणि दुधाचा कॅन घेऊन आले. मतदान (Voting) केंद्राबाहेर दूध ओतून निषेध व्यक्त करत मतदान केले.
नगर शहरातील मध्यवर्ती भागात शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. हा प्रकार काल सायंकाळी झाली. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव आणि नंदू बेंद्रे यात जखमी झाला. राजकीय आणि अर्थकारणातील वाद त्यास कारण असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार नीलेश लंके यांनी जखमींची भेट घेतली. त्यानंतर महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखेंनी भेट घेतली.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.