Lok Sabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'डॅमेज कंट्रोल'साठी भाजपने पाठवला दिल्लीवरुन संकटमोचक; महायुतीला तारणार का?

Nashik Lok Sabha Counstituency Election : लोकसभा निवडणुकीतील स्थिती सुधारण्यासाठी एका फोनने झाला कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय...

Sampat Devgire

Nashik News : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदाना तोंडावर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी आणि आपल्या पारड्यात भरभक्कम मतदान व्हावे, यासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही महत्त पावले उचलली आहेत. या संदर्भात आता भाजप अत्यंत सजग झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढविण्यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यात तातडीच्या उपायोजना, स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील समन्वय तसेच मतदारसंघातील नेमक्या अडचणी शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी खास प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय नेतृत्वाने उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश कुमार शर्मा यांना महाराष्ट्राच्या आढाव्यासाठी पाठविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शर्मा अडचणीतील मतदारसंघांमध्ये खास दौरे करीत आहेत. त्यांच्याकडे मतदारसंघनिहाय राजकीय स्थिती आणि काय उपाययोजना करायच्या याचा नेमका तपशील उपलब्ध असल्याचे बोलले जाते. शर्मा नुकतेच नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात येऊन गेले. यावेळी त्यांनी उमेदवारांना विविध प्रकारच्या सूचना केल्या. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला. याच पद्धतीने राज्यातील विविध मतदारसंघांचा दौरा ते करीत आहेत. त्यामुळे अडचणीतील उमेदवारांसाठी केंद्रीय नेतृत्वाने पाठविलेले 'संकट मोचक' म्हणून शर्मा यांच्याकडे पाहिले जाते.

दिंडोरी मतदारसंघात शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर प्रचंड रोष आहे. यामध्ये कांदा निर्यातबंदी ही प्रमुख अडचण आहे. या संदर्भात शर्मा यांनी विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर दिल्लीत संपर्क केला आणि काही तासात कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय करण्यात आला. याची माहिती अगदी मध्यरात्री बारा वाजता संबंधित उमेदवाराला देण्यात आली. या घोषणेनंतर पुढे काय करायचे याच्या सूचना देखील देण्यात आल्या त्यामुळे दिंडोरी आणि नाशिक मतदारसंघातील वातावरण भाजपला अनुकूल करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

यंदाच्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गट यांच्यासह जवळपास 19 पक्षांची मोट बांधली आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला भाजप खालोखाल 15 जागा देण्यात आले आहेत. सहकारी पक्षांनी हट्ट करून घेतलेल्या या मतदारसंघांमुळे भाजपच्या 45 प्लस या उद्दिष्टाला तडा जाऊ शकतो. त्यामुळे श्री शर्मा विधानसभा निहाय बारीक-सारीक तपशील असलेले अहवाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करीत आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने पाठविलेले संकटमोचक म्हणून त्यांना किती यश मिळते हा उत्सुकतेचा विषय आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT