hemant godse devendra fadnavis chhagan bhujbal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal News : गोडसेंचा पत्ता कटच, भुजबळांनी फडणवीसांचा उल्लेख करत सगळंच सांगितलं

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेवरून महायुतीचे इच्छुक आणि नेते यांच्यात अद्याप संभ्रम कायम आहे.

Sampat Devgire

"पक्षाला जेव्हा गरज असते तेव्हा पक्षासाठी काम करणे आवश्यक असते. महायुतीने उमेदवारीबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे मीदेखील उमेदवारीचे आव्हान स्वीकारणार आहे," असं मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पण, याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) हे आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीचे इच्छुक आणि नेते यांच्यात अद्याप संभ्रम कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी ते म्हणाले, "नाशिक मतदारसंघावर महायुतीच्या भाजप तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार गोडसे यांनीही दावा केला आहे, असा दावा करण्यात गैर काहीच नाही. मात्र, मी स्वतःहून उमेदवारी मागितलेली नाही. पक्षाने उमेदवारी दिल्यास मला तो निर्णय मान्य करावाच लागेल."

"महायुतीने वरिष्ठ स्तरावर मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनीदेखील त्याला दुजोरा दिलेला आहे. त्यामुळे पक्षाने सूचना दिल्यास मला उमेदवारी करावी लागेल. पक्षाला जेव्हा गरज असते तेव्हा पक्षासाठी कोणतेही आव्हानं स्वीकारावे लागते. मीदेखील उमेदवारी मिळाल्यास लोकसभेची निवडणूक लढविणार आहे. मात्र, याचा अर्थ मी वीस वर्षे प्रतिनिधित्व करीत असलेल्या येवला मतदारसंघाला सोडले, असा होत नाही. मी येवल्यासाठी काम करीतच राहील," असं भुजबळांनी सांगितलं.

भुजबळ यापूर्वी खासदार गोडसे यांच्या कामकाजाबाबत आणि त्यांनी केलेल्या विकासकामांच्या दाव्याबाबत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करीत होते. मंगळवारी मात्र अचानक त्यांचा आक्रमक सूर मावळलेला दिसला. "लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास जो उमेदवार असेल, त्याच्यासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी एक दिलाने काम करावे लागेल," असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारीचा निर्णय घेतल्याचे संकेत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT