Chhagan Bhujbal hemant godse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election 2024 : छगन भुजबळांची माघार, नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित?

Akshay Sabale

नाशिक मतदारसंघ ( Nashik Lok Sabha Constituency ) कोणाचा यावरून महायुतीत वाद रंगला होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. या वादात कोणाची सरशी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. येथून मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना उमेदवारी अपेक्षित होती. यातच मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे.

"मी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) आणि गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी माझ्यावर विश्वास दाखवत उमेदवारीबाबत आग्रह धरला, त्यासाठी आभारी आहे," असं भुजबळांनी म्हटलं. त्यामुळे शिवसेनेचे ( शिंदे गट ) विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse ) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासह नाशिक शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांचंही नाव नाशिकच्या उमेदवारीबाबत चर्चेत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हेमंत गोडसे म्हणाले, "केंद्रीय नेत्यांनी छगन भुजबळांच्या उमेदवारीबाबत आग्रह धरला होता. पण, वेळ कमी पडत असल्यानं लोकांपर्यंच पोहोचणं महत्वाचं होतं. भुजबळांनी माघार घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. हा तिढा सुटल्यानं महायुतीचा निर्णय अपेक्षित आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं नाशिकबाबत निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर करावी."

नाशिक शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांच्याही नावाची चर्चा आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर हेमंत गोडसे म्हणाले, "उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक निर्णय घेतील. मुख्यमंत्र्यांनी प्रचार सुरू ठेवण्यासाठी निर्देश दिले आहेत. योग्यवेळी निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती."

छगन भुजबळ काय म्हणाले?

"तीन आठवड्यापासून महाविकास आघाडीचे उमेदवार नाशिकमध्ये प्रचार करत असून आघाडी घेतली आहे. उमेदवारीच्या चर्चेच्या गुऱ्हाळ्यात नाशिकचा तिढा अद्याप सुटला नाही. जेवढा उशिर होईल, तेवढं नाशिकच्या जागेचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे उमेदवारीबाबत तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे. ही संदिग्धता दूर करणं आवश्यक आहे. त्यामुळे मी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारीबाबत आग्रह धरला. त्यासाठी मी आभारी आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी मी प्रचार करणार आहे," असं भुजबळांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT