Rohit Pawar, Sujay Vikhe, Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Sujay Vikhe News : रोहित पवारांच्या मतदारसंघात खासदार विखेंची ‘साखरपेरणी’; शिंदेंनीच फिरवली पाठ

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी विखेंनी कंबर कसली.

सरकारनामा ब्यूरो

ओंकार दळवी

Nagar News : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे हे संपूर्ण नगर जिल्ह्यात मोफत साखर आणि डाळवाटप करीत आहेत. नगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघातही हा कार्यक्रम झाला. मात्र नियोजन ढासळल्याने अनेकांना साखर आणि डाळ मिळाली नाही. त्यामुळे रिकाम्या हाती जावे लागल्याने अनेकांनी नाराजीचा सूर आळवला होता, तर माजी आमदार राम शिंदेंची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरली.

अयोध्येत (Ayodhya Ram Mandir) प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी नगर जिल्ह्यात या सोहळ्यानिमित्ताने साखर आणि डाळवाटप करून आगामी लोकसभेची (LokSabha) साखरपेरणी सुरू केली आहे. यातच काही ठिकाणी त्यांचे साखर व चणाडाळवाटपाचे कार्यक्रम वादग्रस्तदेखील ठरले आहेत.

खासदार विखे यांनी जामखेड तालुक्यातील जवळा, खर्डा, मोहा, जामखेड शहर यांसह तालुक्यातील विविध ठिकाणी साखर आणि डाळवाटप कार्यक्रम झाला. यासाठी कार्यक्रम ठिकाणी आगाऊ नोंदणी करून टोकन वाटप करण्यात आले. शिधापत्रिकांच्या झेरॉक्स घेऊन नंतरच मोफत साखर आणि डाळ दिली जाते. त्यामुळे लाभार्थींपर्यंत वाटप होण्यास मदत होत असल्याचा दावा विखेसमर्थकांनी केला. मात्र प्रत्यक्षात खासदार विखे यांची उपस्थिती असेपर्यंत नागरिकांना वाटप झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विखे कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्यानंतर साखर-डाळ शिधा घेण्यासाठी थांबलेल्या अनेक नागरिकांना हा शिधा मिळालाच नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात अनेक गरजू महिला शेतावर रोजंदारीवर कामावर जातात. या महिलांना रोजगार सोडून शिधा मिळेल, म्हणून त्या अनेक तास ताटकळत थांबल्या होत्या. पण येथील "कोटा" संपला, असे कारण देत या महिलांना शिधा मिळाला नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला गेला.

आमदार शिंदेंनी कार्यक्रमाकडे फिरवली पाठ

खासदार सुजय विखे आणि आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आमदार शिंदे यांनी उघडपणे विखेंना विरोध करताना दिसत आहे. त्यातच दोनच दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल, हे माहीत नाही. त्यामुळे कोणी कितीही लॉबिंग केली, शिफारशी केल्या तरी त्याचा काही फायदा होणार नाही, असे म्हणत नाव न घेता खासदार विखेंना टोला लगावला होता. यातच आज तालुकाभर खासदार विखे यांचे कार्यक्रम असताना आमदार शिंदे यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. आमदार शिंदे हे मुंबई येथे असल्याने कार्यक्रमाला आले नसल्याचे सांगितले गेले.

विखे गट सक्रिय करण्याचा प्रयत्न

विखे कुटुंबीय जिकडे जातील, तिकडे आपले स्वतःचे अस्तित्व सिद्ध करतात. काँग्रेसमध्ये असताना तिथे तालुका विकास आघाड्या कार्यरत केल्या होत्या. हे पुढे आणि आतादेखील या आघाड्या विखे गट म्हणून ओळखले जातात. विखे भाजप असले, तरी त्यांच्या या आघाड्या आणि गट जिल्हाभरात कार्यरत आहेत. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विखे गटाने जिवाचे रान करीत एकनिष्ठा दाखवली. यानंतर विखे गट शांत झाला होता. मात्र आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विखे गटाला पुन्हा चावी देऊन सक्रिय केल्याची जामखेडमधील कार्यक्रमस्थळी चर्चा होती.

(Edited By - Rajanand More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT