radhakrishna vikhe patil ram shinde sujay vikhe patil sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil News : खासदारांचा माफीनामा, तर मंत्री विखे-आमदार शिंदेंची बंद दाराआड चर्चा

Radhakrishna Vikhe Patil On Ram Shinde : राम शिंदे अन् राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली.

Pradeep Pendhare

Ahmednagar Lok Sabha Constituency : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पूर्वनियोजन मेळाव्यात खासदार डॉ. सुजय विखेंनी ( Sujay Vikhe Patil ) माफीनामा सादर केला. त्यानंतर त्यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांची सोमवारी ( 18 मार्च ) सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. विखे पिता-पुत्रांची ही खेळी राजकीय 'डॅमेज कंट्रोल'साठी यशस्वी होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. मात्र, मंत्री विखेंनी आमदार शिंदे यांच्याशी बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा करून भाजप आणि इतर पक्षातील विखे विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी ठरले. या दोघा नेत्यांमधील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही.

नगर लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पूर्वनियोजन आढावा बैठक झाली. प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अभय आगरकर, महेंद्र गंधे, अरुण मुंडे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विखेंनी ( Sujay Vikhe Patil ) मेळाव्यातील भाषणात माफीनामा सादर केला. हा माफीनामा का, याबाबत त्यांनी खुलासा केला नाही. "खासदार झाल्यानंतर काम करण्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ कठीण होता. या कार्यकाळात आपण सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणी दुखावले गेले असतील, तर त्यांची माफी मागतो. प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असते. माझा स्वभाव स्पष्ट बोलणारा आहे. यातून काही दुखावले गेले, काहींनी समजावून घेतले. हे सर्व अनवधानाने झाले. परंतु, आता हे सर्व मागे ठेवून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे," असे खासदार विखे यांनी म्हटले.

खासदार विखे यांनी भाजपच्या मेळाव्यात दुपारी हा माफीनामा सादर करताच त्यांचे वडील पालकमंत्री राधाकृष्ण विखे ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी भाजप नेते आमदार प्रा. राम शिंदे यांची त्यांच्या नगरमधील निवासस्थानी भेट घेतली. मंत्री विखे यांनी आमदार शिंदे यांची घेतलेली ही भेट विखेंचे पक्षातील 'डॅमेज कंट्रोल'साठी होती, असे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मंत्री विखे आणि आमदार प्रा. शिंदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. यात मंत्री विखेंनी पुढाकार घेऊन घेतलेल्या या भेटीची दखल भाजपमधील विखे विरोधकांसह इतर पक्षातील राजकीय नेत्यांनीदेखील घेतली.

विखे पिता-पुत्र 2019 भाजपमध्ये आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नगरमधील भाजपचे पाच उमेदवार पडले. पराभूत उमेदवारांनी याचे खापर विखेंवर ( Radhakrishna Vikhe Patil ) फोडले. यात आमदार प्रा. राम शिंदे हे आघाडीवर होते. यातून आमदार शिंदेंचा विखेंविरोधात संघर्ष वाढला. नगर जिल्ह्यात भाजपमध्ये विखे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. कर्जत-जामखेडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येदेखील विखे गट आणि शिंदे समर्थक, असा संघर्ष पाहायला मिळाला. तसेच भाजपचा निष्ठावान गटदेखील विखेंपासून काहीसे अंतर राखून आहे.

लोकसभा 2024 साठी आमदार प्रा. राम शिंदे हेदेखील इच्छुक होते. तशी त्यांनी पक्षाकडे मागणी केली होती. उमेदवारीसाठी ते सतत पाठपुरावा करत होते. यातून ते विखे पिता-पुत्रांना सतत आव्हान देत होते. परंतु, खासदार विखेंनी सोमवारी झालेल्या मेळाव्यात माफीनामा सादर केला. यानंतर मंत्री विखेंनी आमदार प्रा. शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. ही भेट दीड तासाची होती. या भेटीवेळी कोणताही भाजप पदाधिकारी उपस्थित नव्हता. चर्चेनंतरदेखील या दोघा नेत्यांनी पत्रकारांना तपशील देणे टाळले. मंत्री विखेंची आमदार प्रा. शिंदेंची भेट आणि मेळाव्यातील माफीनामा, हे खासदार विखेंसाठी पुन्हा लोकसभेचे द्वार उघडण्यासाठी यशस्वी ठरेल का?, याची चर्चा आता रंगली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT