ramdas athawale eknath shinde raj thackeray uddhav thackeray sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना सामना, रिपाइं अन् मनसेचा 'पत्ता कट'

Pradeep Pendhare

शिवसेना एकनाथ शिंदे गटाने लोकसभा उमेदवारांची आठ जणांची यादी जाहीर केली. शिर्डीतील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) यांनी दोन दिवसांपूर्वी 'आपलं फिक्स आहे', म्हणून सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी खासदार लोखंडे यांना पुन्हा एकदा शिर्डीतून संधी दिली आहे. शिर्डीत 'शिवसेनाविरुद्ध शिवसेना', असा सामना रंगणार आहे. महायुतीत असलेल्या रिपाइं आठवले गटाचा, अर्थात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा आणि 'मनसे'चा शिर्डीच्या जागेसाठी 'पत्ता कट' झाला.

महायुतीत मनसेची एन्ट्री झाली, तेव्हापासून शिर्डी, नाशिक, दक्षिण मुंबईच्या जागांबाबत पेच निर्माण झाला होता. शिर्डी आणि नाशिकची जागा मनसेला जाणार अशीच काहीशी चर्चा होती. यातच शिर्डीतील खासदार सदाशिव लोखंडे ( Sadashiv Lokhande ) मतदारसंघात संपर्कात नसल्याचे आरोप वारंवार होत होते. त्यामुळे त्यांचा 'पत्ता कट', अशीच काही शक्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डीच्या जागेबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते. खासदार सदाशिव लोखंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शिर्डीतून 'आपलं फिक्स आहे', सांगून कॉन्फिडन्स दाखवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यादी जाहीर केली. यात खासदार लोखंडे यांचे नाव यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत नाव येताच खासदार लोखंडेंच्या कॉन्फिडन्समध्ये वाढ झाली, हे मात्र नक्की!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी लोकसभा मतदारसंघ ( Shirdi Lok Sabha Constituency ) हा राखीव आहे. या मतदारसंघातून महायुतीकडून मनसेच्या पूर्वी रिपाइं आठवले गट जागेसाठी इच्छुक होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनीदेखील जागेवर दावा सांगितला होता. तसा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शिर्डी आणि नगरमध्ये रिपाइं आठवले गटाने मेळावे घेऊन तसा दबाव निर्माण केला होता. यातच महायुतीत नुकताच एन्ट्री झालेल्या मनसेनेदेखील शिर्डीच्या जागेवर दावा सांगण्यात सुरुवात केली होती. नाशिक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेळावा झाला होता. यावे ळी श्रीरामपूरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिर्डीच्या जागेवर दावा सांगत, बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. या राजकीय घडामोडी घडत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा महायुतीत प्रतिष्ठेची करत खासदार लोखंडे यांना पुन्हा एकदा संधी दिली. या संधीवरून शिर्डी लोकसभा मतदारसंघात 'शिवसेनाविरुद्ध शिवसेना', असा सामना रंगणार आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांची ही दुसरी टर्म आहे. शिवसेना फुटीनंतर खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याबरोबर जाणे पसंद केले. आता त्यांना हॅटट्रिक साधण्याची संधी आहे. परंतु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ( Bhausaheb Wakchaure ) यांना उमेदवारी दिली आहे. शिर्डीत तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे असणार आहेत. शिर्डीत शिवसेनाविरुद्ध शिवसेना, असा पहिल्यांदाच सामना रंगणार असल्याने याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT