Heena Gavit  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha: नंदुरबारमध्ये हिना गावित यांची हॅटट्रिक काँग्रेस रोखणार का?

Sampat Devgire

Nandurbar Lok Sabha Election 2024: नंदुरबार मतदारसंघ (Nandurbar Constituency) म्हणजे काँग्रेससाठी महाराष्ट्रातील अमेठी आणि रायबरेली. याची जाणीव असल्याने भाजपने येथे गाव पातळीपासून ताकद लावली आहे. त्यामुळे यंदा काय निकाल लागतो याची सबंध महाराष्ट्राला उत्सुकता आहे. महाराष्ट्रात यंदा बारामती आणि नंदुरबार या दोन मतदारसंघांची विशेष चर्चा आहे. बारामती शरद पवार (Sharad Pawar) यांचा बालेकिल्ला आहे. तर नंदुरबार काँग्रेससाठी (Congress) महाराष्ट्रातील अमेठी आणि रायबरेली एवढा महत्त्वाचा.

गेल्या दोन निवडणुकीत येथून भाजपच्या हिना गावित (Heena Gavit) या मोदी लाटेत विजयी झाल्या आहेत. मात्र येथील जनमानसावर काँग्रेसचा (Congress) प्रभाव भाजपला पुसता आलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजपने (BJP) जेवढी प्रतिष्ठेची केली आहे. तेव्हढीच हिना गावित यांच्या विरोधकांनी गावित यांच्या राजकीय मार्गात काटे पेरण्यासाठी तिचा उपयोग केला. त्यामुळे डॉ. हिना गावित यंदा हॅटट्रिक करण्यात यशस्वी होतील का? हा प्रश्न नेत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप आणि काँग्रेस (BJP And Congress) दोघांनीही आपल्या पहिल्याच यादीत अनुक्रमे खासदार डॉ. हिना गावित आणि गोवाल पाडवी यांची उमेदवारी जाहीर केली. गावित यांची उमेदवारी अपेक्षित होती. मात्र त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्ष आणि सहकारी पक्षांतील नेत्यांचा कट्टर विरोध होता. यामध्ये आमदार अमरीशभाई पटेल, आमदार राजेश पाडवी, जयदीप रावल, अभिजीत पाटील, दीपक पाटील, शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी, डॉ. राजेंद्रकुमार गावित हे प्रमुख नेते होते. यातील काही नेत्यांनी नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम स्थापन केला होता. त्या माध्यमातून गावित यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला. हिना गावित सोडून कोणीही उमेदवार द्यावा त्याच्या विजयाची हमी हमी आम्ही घेतो, असा या नेत्यांचा दावा होता. मात्र भाजप आणि मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यापुढे तो टिकला नाही.

भाजपच्या गावित यांच्या उमेदवारीला विरोधाचे कारण घराणेशाही हे होते. सुप्रिया गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, हिना गावित खासदार आणि विजयकुमार गावित मंत्री त्यामुळे जिल्ह्याचा सर्व अर्थपूर्ण ओघ या तीन खिडक्यांतून एकच घरात जात होता. अनेक वर्ष त्यातून गावित कुटुंबाची राजकीय भरभराट होत आहे. ती विरोधकांच्या नजरेत खुपली. या घराणेशाहीला भाजपने उमेदवारी देऊन एक प्रकारे संरक्षण दिले आहे. परिणामी नंदुरबार फोरमचे सर्व नेते शेवटपर्यंत त्यांच्या प्रचारापासून अलिप्त होते.

विद्यमान खासदार हिना गावित यांना पक्षांतर्गत विरोधकांची कल्पना होती. त्यामुळे या नेत्यांना टाळून त्यांनी थेट गाव पातळीवर संपर्क प्रस्थापित केला होता. या संपर्काचा उपयोग त्यांना प्रचारात झाला. त्याला आव्हान देण्याचे काम माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी केले पाडवी यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ऐनवेळी त्यांचे चिरंजीव गोवाल पाडवी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे दोन तरुण उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली.

नंदुरबार (Nandurbar) मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून येण्याचा विक्रम काँग्रेसचे माणिकराव गावित यांच्या नावावर आहे. काँग्रेससाठी अत्यंत सुरक्षित मतदारसंघ म्हणून इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी (Soniya Gandhi) प्रचाराची पहिली सभा या मतदारसंघात घेत असत. 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांत गांधी कुटुंबातील कोणाचीही सभा येथे झाली नाही. मोदी लाटेत भाजपने ही जागा काबीज केली. यंदा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची सभा झाली. दोन्ही सभांना मतदारांनी दिलेला प्रतिसाद आणि गर्दी ही बोलकी होती. त्यात प्रियंका गांधी उजव्या ठरल्या. यात कोणताही संशय नाही.

मात्र जेवढी हिना गावित यांची यंत्रणा काम करीत आहे. त्या तुलनेत गोवाल पाडवी काहीसे उदासीन दिसले. साधनसामुग्रीत देखील ते कमी पडल्याची कार्यकर्त्यांची खंत आहे. भाजपच्या पक्षांतर्गत विरोधकांची मोठी रसद काँग्रेसला उपलब्ध होती. अशा स्थितीत ही जागा गमावल्यास तो उमेदवाराचा व्यक्तिगत पराभव असेल. तसेच भाजपच्या गावित विजयी झाल्यास तो डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकीय कौशल्याचा विजय असेल, असे ठामपणे म्हणता येईल.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT