Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहेत. कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा मिळावी. अन्यथा येथील उमेदवार पराभूत होईल, असा दावा या इच्छुकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा की शिवसेनेच्या शिंदे गटाचा यावरून गेले महिनाभर महायुतीमध्ये तणाव आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाचाच असा दावा या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा झाला. लोकसभा निवडणूक तयारीसाठीचा हा मेळावा होता. त्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांची उमेदवारी जाहीर केली होती. या घोषणेनंतर महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. विशेषता भाजप आणि त्या पक्षातील इच्छुक अतिशय आक्रमक होऊन ही जागा मिळावी, असे प्रयत्न करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील काही आमदार तसेच लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी मुंबईला गेले होते. याबाबत ग्राम विकास मंत्री आणि नाशिकचे संपर्क नेते गिरीश महाजन यांच्याशी त्यांची चर्चा झाली. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी हा मतदारसंघ शिंदे गटाला आहे, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. हे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट व्हावी यासाठी दिवसभर प्रयत्नशील होते. मात्र अतिशय व्यस्त कार्यक्रम असल्याने त्यांची फडणवीस यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी काल रात्री रित्या हाताने परतले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, याबाबत इच्छुक उमेदवार दिनकर पाटील म्हणाले, हा मतदारसंघ भाजपचा आहे. गेली दोन वर्षे येथे पक्षाने निवडणुकीची तयारी केली आहे. शिंदे गटाची फारशी तयारी नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विषयी नाराजी आहे. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा. शेवटपर्यंत तसे प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे सांगितले. त्यामुळे एकंदरच भाजप आणि शिंदे गटात नाशिक मतदारसंघ कोणाचा यावरून कलगीतुरा रंगला आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.