Nashik News : नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेची पहिली पसंती माजी आमदार राजाभाऊ वाजे हे आहेत. याबाबतचे संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे वाजे सध्या चर्चेत आहेत. त्यामागे एक विशिष्ट राजकीय कारण आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. नाशिकसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीच्या मुख्यमंत्री शिंदे गटाने येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीचे मात्र भिजत घोंगडे आहे.
इच्छुकांच्या विधानांमुळे रोज नवीन नावे चर्चेत येतात. त्यामुळे सध्या उमेदवार म्हणून चर्चेत असलेले विजय करंजकर हे देखील गोंधळलेले दिसतात. या सर्व घडामोडीत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे नाव उमेदवार म्हणून प्रामुख्याने घेतले जाते. त्याला वरिष्ठांची देखील संमती आहे. पर्याय म्हणून अन्य उमेदवारांचा शोध सुरू आहे. परंतु वाजे यांच्या नावावर प्रामुख्याने शरद पवार आणि संजय राऊत यांचे मतैक्य दिसते. त्याला विविध कारणे आहेत.
लोकसभा 2019 च्या चौरंगी लढतीत नाशिक (Nashik) मतदारसंघात मतदानाचा अतिशय धक्कादायक पॅटर्न दिसून आला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना 1 लाख मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 34 हजार 527 मते मिळाली होती. त्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा वाटा होता.
सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना 56 हजार 676, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना अवघी 30 हजार 942 तर अपक्ष माणिकराव कोकाटे यांना 91 हजार 114 मते मिळाली होती. मतदारसंघातील सर्व आठ जिल्हा परिषद गटांमध्ये कोकाटे आघाडीवर होते. मुसळगाव (12,070), भरतपूर (16,691) आणि सिन्नर शहर (14,421) या येथे अन्य सर्व उमेदवारांच्या मतांच्या बेरजेहूनही अधिक मते होती.
मतदानाच्या या पॅटर्नवरून सिन्नरचा उमेदवार असल्यास त्याला पक्ष आणि गट मतभेद विसरून मतदार मतदान करतात असे दिसून आले आहे. त्याचा प्रभाव शेजारच्या इगतपुरी मतदारसंघात देखील दिसून येतो. त्यामुळे वाजे यांना उमेदवारी दिल्यास अन्य उमेदवारांच्या तुलनेत त्यांची मते मिळविण्याची क्षमता ग्रामीण भागात अधिक आहे.
यामुळेच नाशिकचा बारीकसारीक राजकीय अभ्यास असलेले शरद पवार यांनी राजाभाऊ वाजे यांच्याशी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली. शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत यांनी देखील त्यांना पसंती दिली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी आमदार राजाभाऊ वाजे शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी महामार्गावरील अपघात व अन्य रुग्णांसाठी गेली वीस वर्ष सातत्याने काम केले आहे. पोलिसांची मदत पोहोचण्याआधी अपघातग्रस्तांना वाजे यांची रुग्णवाहिका मदतीला येते. कोणाशीही वाद नसलेले आणि सौम्य स्वभावाचे वाजे यांच्यावर गैरव्यवहाराचा कोणताही आरोप नाही.
या सर्व त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकेल. त्यामुळेच उमेदवारीसाठी इच्छुकांची ओढाताण सुरू असताना वाजे मात्र शांत आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या मनात मात्र त्यांनी स्थान प्राप्त केले आहे. या कारणांमुळेच वाजे हे शिवसेनेत उमेदवारीसाठी अग्रभागी आहेत.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.