Subhash Bhamre, Pratap Dighavkar, Amrish Patel Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : धुळ्यात इच्छुकांचे अमाप पीक भाजपच्या मुळावर अन् शिवसेनेच्या पथ्यावर?

Sampat Devgire

Dhule BJP Vs BJP Politics :

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडे इच्छुकांचे अमाप पीक आले आहे. यामध्ये तीन परस्पर विरोधी गटांमध्ये राजकीय ओढताण सुरू आहे. हे राजकारण भाजपच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ मित्रपक्षांना जातो की काय? अशी स्थिती आहे.

धुळे मतदारसंघात (Dhule Loksabha Constituency) सलग तीन वेळा भाजपचा खासदार विजयी झाला आहे. डॉ. सुभाष भामरे हे येथील विद्यमान खासदार आहेत. सर्वाधिक कामे केल्याचा दावा ते करतात. या दाव्यावर पुन्हा उमेदवारी मिळवणार, असा त्यांचा निश्चय आहे. याबाबत त्यांनी जनसंपर्क वाढवत प्रचारालादेखील सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) मार्गात असे काटे पेरले आहेत की, दोन पावले चालणेही खासदार भामरे यांना कठीण होते की काय? असे सध्याचे राजकीय चित्र आहे.

या मतदारसंघात भाजपकडे प्रारंभी अतिशय नवखे इच्छुक उमेदवार होते. मात्र, दोन महिन्यांत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षाने नव्या लोकांना दिलेल्या प्रवेशामुळे सध्या इच्छुकांचे प्रचंड पीक आले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडे सध्या विद्यमान खासदार डॉ. भामरे (Dr Subhash Bhamre) यांसह जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास बच्छाव आणि हर्षवर्धन दहिते, निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर, माजी राज्यमंत्री राजवर्धन कदमबांडे, माजी मंत्री अमरिश पटेल (Amrish Patel), माधुरी बाफना इच्छुक आहेत. या यादीत आता काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांचीदेखील इच्छा असल्याचे बोलले जाते.

भाजपमध्ये (BJP) धुळे जिल्ह्यामध्ये तीन गट कार्यरत आहेत. यामध्ये अमरिश पटेल, जयकुमार रावल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पडद्यामागे राहून राजकीय सोंगट्या हाकणारा एक गट आहे. या तिन्ही गटांचे परस्परविरोधी मत आहे. मात्र, तिघांनीही डॉक्टर भामरे यांच्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केल्याचे बोलले जाते.

यात इच्छुक उमेदवारांचेदेखील वेगळे गट आहेत. दहिते हे खासदार डॉक्टर भामरे यांचे कट्टर विरोधक असून, त्यांचे एकमेकांशी अजिबात जमत नाही. अशीच स्थिती जयकुमार रावल आणि अमरिश पटेल यांचीदेखील आहे. त्यात एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरीकडून विरोध होणे अटळ आहे. अशा स्थितीत एका नावावर सहमती निर्माण करणे पक्षाच्या निरीक्षकांना जवळपास अशक्य आहे. ही स्थिती आता भाजपच्या मुळावर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार डॉ. भामरे यांनी पाच वर्षांत महामार्ग आणि सटाणा विधानसभा मतदारसंघात मोठे काम केल्याचा दावा केला आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यदेखील आहे. मात्र, मनमाड-नरडाणा-धुळे-इंदूर या रेल्वे मार्गाचे काम आहेत तिथेच आहे. त्यात काहीच प्रगती नाही.

कांदा निर्यातबंदी आणि कापसाचे घसरलेले दर हे अत्यंत गंभीर प्रश्न या मतदारसंघात आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम भाजपच्या उमेदवारांवर होणे अटळ आहे. विकासकामांतील टक्केवारीची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

या स्थितीत भाजपला हातातोंडाशी आलेला घास इतर सहकारी पक्षाला भरवावा लागतो की काय? अशी स्थिती आहे. परिणामी धुळे लोकसभा मतदारसंघ भाजप सहकारी पक्षाला देण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये दुहेरी अस्वस्थता दिसून येत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT