Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात मनसे? नाशिकमध्ये चाचपणी; वर्धापनदिनी राज ठाकरे भूमिका जाहीर करणार?

Sampat Devgire

Nashik MNS news :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अठराव्या वर्धापनदिनाच्या सोहळा 9 मार्चला होत आहे. त्याची जोरदार तयारी नाशिकचे कार्यकर्ते करत आहेत. या निमित्ताने मनसेचे पदाधिकारी पहिल्यांदाच 'मनसे' एकत्र आलेले दिसत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक लोकसभा मतदारसंघात रस घेतला आहे. मनसेचे पुणे येथील ॲड. किशोर शिंदे आणि ॲड. गणेश सातपुते यांच्यासह माजी महापौर अशोक मुतडक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या समितीने दोन दिवसांत शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच अन्य घटकांची चर्चा करून लोकसभा निवडणुकीबाबत चाचपणी सुरू केली आहे.

या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नाशिक मतदारसंघातून (Nashik Loksabha Constituency) मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने 9 मार्चला होणारा वर्धापनदिन महत्त्वाचा आहे. सकारात्मक प्रतिसाद असल्यास या मेळाव्यात राज ठाकरे लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

मनसेनेच्या (MNS) स्थापनेला 18 वर्षे झाली आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापनदिन मुंबईबाहेर होत आहे. नाशिकला वर्धापनदिन साजरा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) यांसह विविध नेते उद्या नाशिकमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर स्वागताचे फलक आणि झेंडे लागले आहेत.

राज ठाकरेंचे आज सायंकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे ग्रँड वेलकम होईल. त्यासाठी पाथर्डी फाटा येथे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जल्लोषात ठाकरेंचे स्वागत करतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरेंच्या यापूर्वीच्या दौऱ्यापूर्वी शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी दिसून आली होती. त्यावरून राज यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी देखील केली होती. त्यानंतर आताच्या दौऱ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने सर्वच पदाधिकारी मनापासून एकत्र आले आहेत.

राज ठाकरे नाशिक दौऱ्यात उद्या (8 मार्च) काळारामाचे दर्शन घेणार आहेत. काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) पूजा केल्यानंतर ते शहरातील विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी आणि साधू-संतांची चर्चा करतील. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनावर पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याची छाप पडलेली दिसून येते. त्यामुळे मनसेचा यंदाचा वर्धापनदिन हा अनेक दृष्टीने वेगळा करण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT