भाजपने दोन दिवसांपूर्वी देशातील 195 लोकसभा उमेदवारांची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. याला कारण महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा न झालेला निर्णय. जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने एकमत होत नाही.
त्यामुळे आता थेट केंद्रीय गृहमंत्री आजपासून दोन दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून बसणार आहेत. त्यातच नंदूरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील वाद उफाळून आल्याने विद्यमान खासदार हिना गावित यांच्या उमेदवारीबाबत भाजप पुनर्विचार करणार की विरोध करणाऱ्या शिवसेनेला थेट बोल सुनावणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हातात हात घालून सरकारमध्ये असले तरी दोन्ही पक्षांत लोकसभा उमेदवारीवरून अनेक ठिकाणी वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदुरबारच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) शिवसेनेला विश्वासात घेत नसल्याचा शिवसेनेचा (Shivsena) आरोप आहे. त्याला भाजपमधील (BJP) अंतर्गत विरोधकांचाही सूर मिळाल्याने गावित अडचणीत आल्या आहेत.
नंदुरबारमधील शिवसेना आणि भाजपमधील गावित गटातील वाद कायम चर्चेचा विषय राहिला आहे. सत्तेतील या दोन्ही मित्रपक्षांमध्ये नंदुरबारमध्ये कधीच मैत्री झाली नाही. त्यामुळेच की काय कधी शिवसेनेने तर कधी भाजपने जिल्ह्यातील सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसच्या फुटीरांशी हातमिळवणी केली.
आता हा वाद लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेने खासदार डॉ. गावित यांच्या एकतर्फी आणि मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटले आहेत. गावित परिवाराकडे असलेल्या आदिवासी खात्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांची होणारी अडवणूक थांबत नसल्याने जिल्ह्यातील शिवसेना संपर्कप्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपने उमेदवार बदलावा, अशी मागणी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांचे आरोप फेटाळले आहेत. रघुवंशी यांचा कायमच विरोध असून, त्यांची सलगी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांसोबत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते काँग्रेसमध्ये असल्यापासून आम्हाला विरोध करत आहेत. रघुवंशी काँग्रेस वृत्तीचे आहेत. ते एकनाथ शिंदेंनाही धोका देऊ शकतील, असा इशाराही हिना गावीत यांनी दिला आहे.
शिवसेना आणि भाजपच्या डॉ. हिना गावित गटातील वादामुळे नंदुरबारमधील राजकारण ढवळून निघाले आहे. या वादानंतर जिल्ह्यातील महायुतमध्ये ऑल इज वेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या वादावर दोन्ही पक्षांतून कसा तोडगा काढणार, हे येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.