Loksabha Election 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024: 'नगर दक्षिण'मध्ये मतदानासाठी बॅलेट पेपर वापरावा लागणार?

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : आरोप-प्रत्यारोपानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांचे राज्य दौरे सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे हे दौरे अगदी शांततेने सुरू आहेत.

असे असले तरी मराठा आरक्षणाची लढाई चालूच आहे, हे सांगण्यासाठी लोकसभा निवडणुकीत केंद्र, राज्य सरकार आणि प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून आखली जात आहे. ही रणनीती यशस्वी झाल्यास नगर जिल्हा प्रशासनाला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 'ईव्हीएम'ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर त्यांच्या विधानाच्या चौकशीसाठी विशेष पथकाकडून चौकशीची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मराठा आंदोलकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विविध ठिकाणी विनापरवाना घेतलेल्या सभाप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. यावरदेखील मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाकडून वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे दोन दिवसांपूर्वी नगर दौऱ्यावर होते. सकल मराठा समाजाच्या आंदोलकांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यासाठी आंदोलकांनी गनिमी कावा केला. केंद्रीय मंत्री राणे यांनी यावर आंदोलकांना फटकारले. 'हिंमत असेल, तर समोर या', असे प्रति आव्हान दिले. या आंदोलनामुळे मराठा आंदोलकांनी आता लोकसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे. आता महाराष्ट्रातून केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवण्याचे टार्गेट मराठा आंदोलकांनी ठेवले आहे. यासाठी प्रत्येक मतदारसंघातून शेकडोने अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. नगरमध्येदेखील याची तयारी सुरू असून, बैठकांचा जोर वाढला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा खुला आहे. या मतदारसंघात भाजपचा (BJP) विद्यमान खासदार आहे. या मतदारसंघात किमान '४०० प्लस' उमेदवारी अर्ज विधानसभा मतदारसंघनिहाय दाखल करण्याचे नियोजन मराठा आंदोलकांनी केले आहे. यासाठी बैठका सुरू आहेत. गेल्या चार दिवसांत नगर तालुका, जामखेड आणि श्रीगोंदे तालुक्यात बैठका झाल्या असून, त्यांना प्रतिसाद मिळाला आहे. या बैठकांमध्ये उमेदवारांची नावांची यादीदेखील निश्चित करण्यात आली असून, ती फुटू नये याचीदेखील काळजी घेतली जात आहे. तसेच मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे २२ आणि २३ मार्चला नगर दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची पारनेर येथे बैठक होणार आहे. यात ते लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका मांडतील, असे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील तीन तालुक्यात बैठका झाल्यानंतर इतर ठिकाणी बैठकांचे नियोजन सुरू आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी मराठा आंदोलकांना दाबत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून निरोप पोहोचवत आहेत. निवडणुकीपासून लांब राहण्याच्या सुचवत आहेत. त्यामुळे मराठा समाज बैठकांपासून दूर जरी असला, तरी मदत करत आहे. काही जण दबावाला झुगारून पुढे येत आहेत. उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी तयार असल्याचे सांगत आहे. असा प्रतिसाद बैठकांना मिळतो आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलकांनी (Maratha Protest) '४०० प्लस' उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन ठेवले आहे. यासाठी आर्थिक मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने मराठासह इतर समाज पुढे येत आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या या गनिमी काव्याची भनक जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा निवडणूक शाखेला नसल्याची माहिती समोर येत आहे. ऐनवेळी एवढे उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या मैदानात आल्यास पर्यायी व्यवस्था काय, याबाबत कोणतेच नियोजन प्रशासकीय पातळीवर नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच, मराठा आंदोलक असे काही करणार नसल्याचा विश्वासदेखील जिल्हा प्रशासन व्यक्त करत आहे. हा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधीच्या भरवशावर जिल्हा प्रशासन व्यक्त करत असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT