Supriya Sule 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Supriya Sule : संगत लय वाईट, देवाभाऊ त्यातूनच बिघडले; खासदार सुळेंचा अजितदादांना टोला

NCP SharadChandra Pawar party MP Supriya Sule Mahayuti Devendra Fadnavis Ajit Pawar Ahilyanagar : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेत महायुतीमधील नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अहिल्यानगरमध्ये महायुतीमधील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात चांगलीच टोलेबाजी केली.

"देवाभाऊ हे नाव मला खूप आवडते. पण त्याला संगत खराब लागली. आजच्या भाजपपेक्षा आधीची भाजप चांगली होती", असा टोला सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लगावला.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाला अवघे चार दिवस राहिलेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या (MVA) प्रचाराच्या तोफा संपूर्ण महाराष्ट्रभर धडधडत आहेत. यातून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीमधील नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवाभाऊ नाव मला आवडते. एकेकाळी या नावाबद्दल खूप आदर होता. विरोधक पण दिलदार असावा असे वाटत होते. पण त्याला संगत खराब लागली. आजच्यापेक्षा आधीची भाजप चांगली होती. नितीन गडकरी चांगलेच आहेत व ते दिल्लीतच असतात. पण आताची भाजपला (BJP) चांगली संगत नाही". आर. आर. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी एक लाख पोलिस भरती केली. परंतु आजचा गृहमंत्री बदलापूर घटनेनंतर बंदूक दाखवतो. यातून देवाभाऊ संगतीने बिघडला हे स्पष्ट होते, असा टोला खासदार सुळे यांनी फडणवीस यांच्यासह अजितदादांना लगावला.

'एक खोका म्हणजे एक कोटी व असे 50 खोके 40 आमदारांना दिले गेले म्हणजे 2 हजार कोटी रुपये देऊन उद्धव ठाकरें सरकारचे चांगले काम असताना ते पडून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला गेला. हेच पैसे नगरला आले असते, तर येथे रस्ते सोन्या-चांदीचे झाले असते, दुधाला दर दिला असता, तर दुधवाल्याच्या माऊलीच्या हातात एखादी सोन्याची बांगडी दिसली असती, सरसकट कर्जमाफीही मिळाली असती. तरी देवाभाऊ म्हणतात मी दोन पक्ष फोडून आलो. त्यामुळे हा भ्रष्टाचार, ही वाढती महागाई व बेरोजगारी ज्यांच्यामुळे वाढली, त्यांना मोडून काढण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे', असे खासदार सुळे म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीआधी मी दोडकी बहीण होते, परंतु त्या निवडणुकीने, असा दणका दिला की मी 'लाडकी बहीण' झाले, परंतु एकीकडे महिलांना दीड हजार रुपये दिले जातात, तर दुसरीकडे तेलाचा डबा 2200 रुपये करून ते पैसे काढून घेतले गेले. साधा कापूर पण स्वस्त नाही व देवापुढे अर्धाच लावावा लागतो, असे म्हणत शेतकऱ्यांच्या दुधाला भाव तीस रुपये लिटर आहे व ग्राहकाला 60 रुपये मोजावे लागतात. मग मधले 30 रुपये कोठे जातात? असा सवाल खासदार सुळे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT