Eknath Shinde ShivSena Shocks BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde ShivSena Shocks BJP : शिंदे शिवसेनेकडून भाजपला 'धोबीपछाड', तर भाजपकडून काँग्रेसचा 'धुव्वा'; कुठे भिडले एकमेकांविरोधात!

Eknath Shinde Shiv Sena shocks BJP in Dhule while BJP breaks Congress stronghold in Gadchiroli, triggering fresh political buzz in Maharashtra : धुळे अन् गडचिरोली इथं नगरपरिषदेच्या चुरशीच्या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेकडून भाजपचा, तर भाजपकडून काँग्रेसचा पराभव झाला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Bypoll Results : महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नगर परिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत सत्ताधारी मित्रपक्षांमध्येच चुरस पाहायला मिळाली.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपला धक्का देत विजय मिळवला, तर गडचिरोलीत भाजपने काँग्रेसचा बालेकिल्ला भेदत दमदार विजय नोंदवला.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेने दोन्ही जागा आपल्या नावावर केल्या. यातील एका जागेवर भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने आली होती. या निवडणुकीत सत्ता, संघटन आणि धनशक्ती यांचा जोरदार संघर्ष पाहायला मिळाला.

या निवडणुकीत आमदार मंजुळा गावित स्वतः मैदानात उतरल्या होत्या, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची बनली होती. भाजपकडूनही (BJP) मंत्री, आमदार, खासदार यांची ताकद पणाला लागली होती. एका जागेवर दिलीप चौरे अवघ्या 9 मतांनी विजयी झाले, तर दुसऱ्या जागेवर शेख वसीमा अबिद यांनी भाजपच्या उमेदवाराचा 67 मतांनी पराभव करत शिंदे सेनेचा झेंडा फडकावला.

दुसरीकडे गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणुकीत भाजपने काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे. येथे भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांनी काँग्रेसचे विनोद भांडेकर यांचा 264 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बावणे यांना केवळ 98 मतांवर समाधान मानावं लागलं. माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

गडचिरोलीतील या पोटनिवडणुकीत तब्बल 75 टक्के मतदान झाले, ज्यामध्ये 2620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गडचिरोली हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. अशा ठिकाणी भाजपने मिळवलेला विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला असून राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक निवडणुकांचे हे निकाल आगामी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे संकेत देणारे ठरू शकतात, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT