

Nilesh Lanke Tiger Video Goes Viral : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथींचे संकेत मिळत असतानाच एक व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’ चर्चेनंतर आता खासदार नीलेश लंके यांचा एक व्हिडिओ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या व्हिडिओत लंके एका वाघाच्या गळ्यातील दोरी हातात घेऊन फिरताना दिसत आहेत. पण हा फक्त व्हिडिओ आहे की महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एखादा मोठा संकेत?
राज्यात महायुतीमधील भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या हिट लिस्टवर सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याची चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदललं. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नवीन चिन्ह आणि नवीन संघटनात्मक अडचणी असूनही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दमदार कामगिरी केली.
त्यानंतर विधानसभेतही महाविकास आघाडीने जोरदार लढत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) सर्वाधिक 20 आमदार निवडून आले आणि पक्षाने पुन्हा ताकद दाखवून दिली. मुंबई महापालिका निवडणुकीतही पक्षाच्या कामगिरीची राज्यभर चर्चा झाली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील मोठ्या राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात अचानक आॅपरेशन टायगर या चर्चांना वेग आला. चर्चेनुसार या ऑपरेशनअंतर्गत शिवसेना ठाकरे पक्षाचे तब्बल सहा खासदार फुटल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी ही घडामोड झाली, त्याच दिवशी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमागे शिंदे असल्याच्या चर्चा अधिक रंगल्या.
भाजपचे नेते अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येत, एकच शिवसेना आहे ती, एकनाथ शिंदे यांची, अशी गर्जना केली. या सर्व राजकीय वातावरणात शरद पवार मात्र शांत दिसत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम आणि कौटुंबिक व्यस्ततेत ते दिसत असले तरी राज्यातील प्रत्येक राजकीय हालचालीवर त्यांची नजर असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.
अशातच त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार नीलेश लंके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका आलिशान ठिकाणी शूट झालेल्या या व्हिडिओत लंके यांच्या हातात जाड दोरी दिसते. त्या दोरीचे दुसरे टोक थेट एका वाघाच्या गळ्यात बांधलेले आहे. वाघ आपल्या रुबाबात चालतोय, तर लंके त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून मागे चालताना दिसत आहेत.
व्हिडिओतील सर्वात चर्चेचा क्षण म्हणजे, वाघ एका ठिकाणी थांबल्यानंतर लंके पुढे होऊन त्याच्याकडे रोखून पाहतात. हा फक्त सामान्य व्हिडिओ आहे की एखादा राजकीय संदेश? या व्हिडिओखाली सोशल मीडियावर अनेक भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला आगामी राजकीय समीकरणांचा इशारा मानत आहेत, तर काहींच्या मते हा थेट महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांबाबतचा प्रतीकात्मक संदेश असू शकतो.
सध्या एक प्रश्न सगळ्यांच्या चर्चेत आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘वाघाची दोरी’ नेमकी कुणाच्या हातात जाणार? आणि शांत बसलेले शरद पवार अजून एखादी मोठी खेळी खेळणार का? राजकीय वर्तुळात आता याच चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.