Maha Vikas Aghadi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीसमोर जागावाटपाचा पेच; अनेक मतदारसंघावर घटक पक्षांनी ठोकला दावा

Sampat Devgire

विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यामध्ये अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे हा तिढा कसा सुटणार हा पक्षश्रेष्ठी आणि इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. यावर मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्याभरात चर्चा सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये विजेता आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेला उमेदवार एकच मतदारसंघात आहे. अशावेळी ज्या पक्षाची संबंधित मतदारसंघात संघटनात्मक ताकद अधिक आहे. त्याला ती जागा दिली जाऊ शकते. यामध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची देवाण-घेवाण होईल, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. काहींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

मात्र यातून कमकुवत असलेल्या महायुतीतील घटक पक्षांना आघाडीच्या मतभेदांचा फायदा होऊ नये, याला प्राधान्य दिले जाण्याचे धोरण आहे.नाशिक जिल्ह्यातील देवळाली, नाशिक मध्य, सिन्नर, निफाड, दिंडोरी, येवला या मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात उमेदवारांची अदलाबदल होण्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने घडामोडी घडत आहेत.

राज्यात भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. यातून आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची मजबूत आघाडी तयार झाली आहे.

ही आघाडी महायुतीला पराभूत करण्यात लोकसभा निवडणुकीमध्ये यशस्वी झाली. तोच आत्मविश्वास घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची व्युहरचना केली जात आहे. मात्र मतदारसंघात स्थानिक स्तरावर पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांत अनेक मतभेदांचे विषय आहेत.

यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची लढत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची झाली होती. त्यात विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार दोन्हीही याच पक्षाचे होते.

अशा स्थितीत तो मतदार संघ कोणाला द्यायचा आणि तिथे उमेदवार कोण? असा गंभीर प्रश्न आहे. त्यावर वरिष्ठ नेत्यांनी तोडगा काढला आहे, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वतंत्रपणे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT