Maharashtra politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी 18 जानेवारीला पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपकडून गिरीश महाजन आणि रायगड मध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र दोघांच्याही नावाला विरोध झाल्याने सरकारवर पालकमंत्रीपद रद्द करण्याची नामुष्की ओढावली.
रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले पालकमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. आदिती तटकरेंच्या नावाला त्यांनी तीव्र विरोध केला. गोगावले समर्थकांनी जिल्ह्यात आंदोलने केली. तर दुसरीकडे नाशिकमध्येही शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे वरिष्ठ असूनही त्यांना डावल्यात आल्याने समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. तर जिल्ह्यात सर्वांधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याने अजित पवार गटालाही नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे होते. महायुतीतील घटक पक्षांमध्ये पालकमंत्रीपदाची ही स्पर्धा पाहाता दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली होती.
नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रायगड दौरा झाला. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान रायगडचा आणि त्यापाठोपाठ नाशिकचाही तिढा सुटेल असे बोलले जात होते. मात्र, आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन नाशिकच्या पालकमंत्रीपदाचं घोडं अडलं आहे अशी माहिती मिळत आहे. रायगडमधील गोगावले विरुद्ध तटकरे हा संघर्ष काही थांबण्याचे नाव घेत नसल्याने नाशिकचेही पालकमंत्रीपद घोषित करण्यासाठी विलंब होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्यामुळे नाशिकमधील पालकमंत्रीपद भाजप स्वत:कडेच ठेवण्याची दाट शक्यता आहे. मागील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाचा असलेला अनुभव पाहाता गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी वर्णी लागू शकते. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी यापूर्वीच नाशिक जिल्ह्यात कामाला सुरुवात केली आहे. गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याने दादा भुसे हे बॅकफूटवर गेले आहेत.
दरम्यान रायडगचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीने स्वतःकडेच ठेवले तर नाशिकमध्ये शिवसेनेकडून पालकमंत्रीपदाची मागणी जोर धरु शकते. त्यामुळे आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रायगडचा तिढा सुटल्यानंतरच नाशिकचा तिढा सुटेल अशी परिस्थिती दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.