
Phule Movie : महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित येऊ घातलेला 'फुले' चित्रपट काही दिवसांपासून वादात सापडला आहे. हा सिनेमा ११ एप्रिलला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रदर्शित होणार होता. पण, या चित्रपटाला ब्राम्हण महासंघाने विरोध केल्याने चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलावं लागलं आहे. आता २५ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ब्राम्हणांबाबतचं चित्रण करणारे प्रसंग वगळावेत अशी मागणी केली जात असतानाच आता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यात उडी घेतली आहे.
छगन भुजबळ हे या चित्रपटाच्या बाजुने उभे राहिले आहेत. भुजबळ म्हणाले आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. त्यात जे सत्य आहे तेच दाखवले आहे. त्यावेळी सगळेच ब्राह्मण महात्मा फुले यांच्याविरोधात नव्हते, केवळ काही कर्मठ ब्राह्मण त्यांच्या विरोधात होते. अनेकांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची मदत केली आहे असही भुजबळांनी यावेळी म्हटले.
भुजबळ पुढे म्हणाले, या चित्रपटातून महात्मा फुले यांच्या संबधित लिहलेल्या ग्रंथ, पुस्तकातले आणि फुले यांनी लिहलेले दाखवले जात आहे. आम्ही ब्राह्मण विरोधी नाही. आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करत नाही आहोत. सर्व ब्राम्हण जरी फुले यांच्या विरोधात नव्हते, तरी काही कर्मठ ब्राम्हणांचा त्यांना विरोध होता.
छगन भुजबळ म्हणाले, फुले चित्रपट सर्वांनी बघायला हवा. त्यावेळचा इतिहास समजून घ्यायला पाहीजे. जातीयवाद करुन जे इतरांना कमी लेखतात त्यांनी हा चित्रपट आवश्य पाहायला पाहिजे. आपण इतिहास विसरत चाललो आहोत. महात्मा फुले यांचे लेखन, संपादन व कृती ही त्या वेळच्या कर्मठ ब्राम्हणांच्या विरोधात आहे. त्यांचा लढा ब्राम्हणांविरोधात नव्हे तर ब्राम्हण्यवादाविरोधात आहे.
चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं असून त्यांनी देखील या सगळ्या घडामोडी पाहाता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सेन्सॉर बोर्डाने काही सुधार सांगितले आहेत. जे आम्ही देखील स्वीकारले आहे. सिनेमातील एकाही सीनवर कात्री फिरवण्यात आलेली नाही. हा एक शैक्षणिक सिनेमा असून सगळ्यांनी तो पाहावा. आम्हाला कोणत्याही कारणास्तव हा सिनेमा वादात अडकू द्यायचा नाही, म्हणून आम्ही प्रदर्शनाची तारीख दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट 'फुले' येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटात क्रांतिकारी दाम्पत्याच्या स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक परिवर्तनासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. या चित्रपटाचा उद्देश आजच्या पिढीस ऐतिहासिक धड्यांची माहिती देताना नवीन विचारांची दारे उघडणे आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केलं आहे, तर महात्मा फुले यांच्या भूमिकेत प्रतीक गांधी आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पत्रलेखा दिसणार आहेत. अशी माहिती निर्मात्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.