Maharashtra Railway Project News : गुजरातमधील रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळत असताना महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मात्र रखडल्याने आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.
विशेष म्हणजे विरोधकांनंतर आता महायुतीमधील आमदारही या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत.
नाशिक-शिर्डी (Shirdi) दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी प्रशासनाने भूसंपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. त्याचवेळी केंद्र सरकारने गुजरातमधील अहमदाबाद-धोलेरा सेमी हायस्पीड ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. मात्र, संगमनेरमार्गे प्रस्तावित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा विषय अचानक थंडबस्त्यात गेल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजी वाढत आहे.
या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), आमदार सत्यजीत तांबे यांच्यानंतर आता महायुतीतील एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनीही उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे हा मुद्दा ठामपणे मांडणार असल्याचे खताळ यांनी स्पष्ट केले.
अमोल खताळ म्हणाले की, “केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दूरसंचार केंद्राचे कारण पुढे करत संगमनेरमार्गे जाणारा पुणे-नाशिक रेल्वे मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला, हा अत्यंत धक्कादायक आहे. हा प्रकल्प पुन्हा मंजूर व्हावा यासाठी आम्ही आता थेट राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार आहोत.”
दरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संगमनेरमार्गे प्रस्तावित रेल्वे मार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, दूरसंचार विभागाने स्वतः रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठवून प्रस्तावित मार्गापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरून रेल्वे नेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले होते, असा दावा आमदार खताळ यांनी केला आहे.
या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यात अनेक ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या असून त्यांना कोट्यवधी रुपयांची भरपाईही मिळाली आहे. त्यामुळे प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अचानक मार्ग बदलणे आणि नंतर प्रकल्पच रद्द करणे हा स्थानिकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अमोल खताळ यांनी या निर्णयातील कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचा इशाराही दिला आहे. गरज पडल्यास जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, आंदोलन करू; पण हा प्रकल्प पुन्हा मंजूर करूनच घेऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प हा केवळ वाहतुकीचा विषय नसून संगमनेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. या रेल्वेमुळे औद्योगिक गुंतवणूक, शिक्षण, कृषी क्षेत्र, रोजगारनिर्मिती आणि शेतमाल वाहतुकीला मोठी चालना मिळाली असती.
आता या निर्णयाविरोधात लवकरच रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन संगमनेरची भूमिका मांडणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पावरून आता केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, गुजरातला मंजुरी आणि महाराष्ट्राला थांबा? असा सवाल जोर धरू लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.