Shalarth ID Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID Scam : शिक्षण विभागाने तब्बल 530 शिक्षकांना पाठवले घरी; 160 कोटींचा शालार्थ आयडी घोटाळा भोवला

Shalarth ID Scam Jalgaon : नाशिक विभागातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हा घोटाळा झाला. भारतीय जनता पक्षाशी संलग्न नेत्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये सहाशेहून अधिक शिक्षकांच्या बनावट नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते.

Sampat Devgire

Jalgaon News, 28 Oct : राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील 530 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील अधिकारी आणि सत्ताधारी भाजपशी संलग्न नेत्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात राज्यातील सुमारे 160 कोटी रुपयांच्या शासकीय अनुदानाचा अपहार झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक विभागातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने हा घोटाळा झाला. भारतीय जनता पक्षाशी संलग्न नेत्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये सहाशेहून अधिक शिक्षकांच्या बनावट नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते.

या प्रकरणी शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संबंधित संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी करून कारवाई सुरू केली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 530 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेशही देण्यात आले होते. नाशिक विभागातील 893 शिक्षकांपैकी जळगाव जिल्ह्यातील सुमारे 600 शिक्षकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यापैकी 530 जणांना बडतर्फ करण्यात आले आहे.

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्र्यांचे निकटवर्तीय असलेल्या संजय गरुड आणि त्यांच्या भावाने 12 बनावट संस्था स्थापन केल्याचा आरोप आहे. या संस्थांच्या माध्यमातून अनेक नातेवाईकांसह इतर कर्मचाऱ्यांच्या बनावट नियुक्त्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात गरुड बंधूंना अटक करण्यात आली असून, त्यांचा जामीन अर्ज स्थानिक न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयानेही यापूर्वी फेटाळला आहे.

दरम्यान, विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना यापूर्वीच बडतर्फ करून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. विधिमंडळातही या घोटाळ्याची चर्चा झाली होती. त्यानंतर या प्रकरणात कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT