Mahatma Phule Committee Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahatma Phule : सरसंघचालक मोहन भागवत यांनी इतिहास बदलू नये, महात्मा फुले अभ्यासावेत!

Sampat Devgire

Mahatma Phule News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी विषयी वक्तव्य केले होते. हे वक्तव्य निराधार असल्याने त्याचा महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे आज निषेध करण्यात आला.

यासंदर्भात महात्मा फुले जयंती समितीचे पदाधिकारी पंचवटी येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ जमले. या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांचा जयघोष देखील केला.

यावेळी समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक भागवत यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले होते. श्री भागवत यांनी इतिहासाची मोडतोड केली आहे. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे.

त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले की, अनावधानाने केले हे माहिती नाही. मात्र त्यांनी अखिल भारतात नावाजलेले समाज सुधारक व बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेले महात्मा फुले यांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते.

लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव देखील टिळक यांनी सुरू केलेला नाही. याबाबत श्री. भागवत यांनी पुरेशी माहिती घेतली असती तर, बरे झाले असते.

इतिहासात लोकमान्य टिळक यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली असे प्रमाण नाही. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी रायगड किल्ला जिंकला. त्यानंतर १८६९ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे रायगडावर गेले होते. तेथे त्यांनी परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.

त्यानंतर महात्मा फुले यांनी शिवाजी महाराज यांच्यावर एक पोवाडा लिहिला. फुले यांनी शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी चळवळ सुरू केली. हे सर्व संदर्भ इतिहासाच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहेत. याचा अभ्यास करून श्री भागवत यांनी वक्तव्य करायला पाहिजे होते, अशी अपेक्षाही श्री खैरे यांनी व्यक्त केली.

यावेळी महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजश्री काठे, शरद मंडलिक, शंतनु शिंदे, भास्कर जेजुरकर, सतीश गायकवाड, रामेश्वर साबळे, किशोर भास्कर, सचिन खोडे, रवींद्र शिंदे, महेश ढोले, संदीप खैरे यांसह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT