Malegaon Bribery Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचा स्वीय सहायक नीलेश पाटील आणि लेखापाल हरीश डिंबर यांच्या घराची झडती घेतली. तब्बल सुमारे 12 ते 16 तास चाललेल्या घरझडतीत एसीबीच्या हाती मोठ्या प्रमाणात रोकड लागली आहे. विशेषतः आयुक्त जाधव याच्या दोन घरांच्या घरझडतीपेक्षा स्वीय सहायक पाटीलच्या घरात जास्त रोकड मिळाली आहे.
लाचखोर आयुक्त जाधव यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील फ्लॅटमधून ११ लाख ८७ हजारांची रोकड तर, मालेगाव येथील शासकीय निवासस्थानातून ९ लाख ३८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक नीलेश पाटील याच्या घरझडतीतून ३१ लाख १५ हजारांची रोकड जप्त करण्यत आली आहे. लेखापाल डिंबर याच्या घरातून १३ लाखांच्या रोकड व ऐवजासह १५ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान तिघा लाचखोरांच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून आता संशयितांच्या बँक लॉकरचा शोध घेतला जात आहे.
महापालिकेत केलेल्या विकास कामांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून प्रत्येकी चार टक्क्यांप्रमाणे ८० हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आयुक्त जाधव, नीलेश पाटील, हरीश डिंबर यांना एसीबीच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतलं होतं. जाधव, पाटील यांना घोटी येथे तर डिंबर यास मालेगावातून अटक केली होती. त्याचवेळी पथकांनी या तिघांच्या घरावर एकावेळी छापेमारी करीत घरझडती घेतली.
एसीबीकडून तिघाही लाचखोरांच्या बँक खात्याची माहिती घेण्यात आली असून, ती गोठविण्यासंदर्भात पाठपुरावा केला जाणार आहे.तसेच लॉकरचा शोध घेतला जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
लाचखोर आयुक्त रविंद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश पाटील व महापालिकेचे लेखापाल हरीश डिंबर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. २९) ताब्यात घेतले होते. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी (दि. ३०) त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालय व परिसरात मोठी गर्दी झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.