Malegaon Municipal Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Mahapalika : मालेगावात एमआयएम-इस्लाम नगरसेवकांमध्ये पुन्हा राडा, महापौर नसरीन शेख यांचा कडक शब्दात इशारा..

Mayor Nasreen Sheikh warning Corporator : मालेगाव महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत पुन्हा एकदा एमआयएम-इस्लाम पक्षाचे नगरसेवक आपआपसात भिडले. यावेळी धक्काबुक्की झाली व तणाव निर्माण झाला.

Ganesh Sonawane

Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेच्या विशेष महासभेत गुरुवारी एमआयएम व इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बीएलओ'च्या निवडीवरुन जोरदार राडा झाला. हमरी-तुमरी करत एमआयएम व इस्लाम पक्षाचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले तसेच धक्काबुक्की झाली. यावेळी बराचवेळ गोंधळ निर्माण होऊन महासभेचे कामकाज विस्कळीत झाले. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये सलग दुसऱ्यांदा महासभेत असा प्रकार घडल्याने महापौरांनी नगरसेवकांना गंभीर इशारा दिला आहे.

निवडणूक आयोतर्फे शहरात मतदार यादी पडताळणी व पुनरीक्षणाचे (एसआयआर) सर्वे सुरू आहे. बीएलओ कामाची जबाबदारी अनेक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे शहरातील सुशिक्षित बेरोजगारांची सहायक बीएलओ म्हणून नियुक्ती करावी. यासाठी झालेल्या विशेष महासभेत एमआयएम व इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांमध्ये महापौरांच्या समोरच जोरदार राडा झाला. शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली.

महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक बीएलओंच्या नियुक्तीसंदर्भात विशेष महासभा झाली. दरम्यान प्रचंड गदारोळात सहायक बीएलओ म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नियुक्त करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला. एमआयएमच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला.

नेमका वाद कसा झाला?

संबधित ठरावावर एमआयएमचे डॉ. खालीद परवेज यांनी जोरदार आक्षेप घेत सहायक बीएलओंना वेतन कोण अदा करेल? महापालिकेच्या अंदाजपत्रकात हा मुद्दा घेतला आहे का? असे प्रश्न महापौर व उपमहापौर यांच्यासमोरील मोकळ्या जागेत जाऊन उपस्थित केले. इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांनी जागेवर बसून बोलता आले असते, असे सांगत त्यांच्या या कृतीला हरकत घेतली. इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांनी मोकळ्या जागेत धाव घेत खालिद परवेझ यांना त्या ठिकाणाहून हटविण्याचा प्रयत्न केला. यावरून वाद झाला. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची व धक्काबुक्की झाली. या गदारोळात महासभेने ठराव संमत केला.

दरम्यान डॉ. खालीद हे जाणीवपूर्वक असा प्रकार करीत असल्याचे महापौर व उपमहापौर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसऱ्यांदा महासभेत असा प्रकार घडला असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी सभागृहात चार सुरक्षारक्षक असतील. असे प्रकार पुन्हा घडल्यास अशा नगरसेवकांना निलंबित करू, असा इशारा महापौरांनी दिला. दरम्यान हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. दरम्यान आता जिल्हाधिकारी ठराव मंजूर करतात की फेटाळतात हे पाहावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी नगरसेवकांमध्ये झाला होता राडा

काही दिवसांपूर्वी देखील मालेगाव महापालिकेत अंदाजपत्रकीय मंजुरीच्या विषयावरुन सत्ताधारी इस्लाम पार्टी आणि एमआयएमच्या नगरसेवक एकमेकांच्या विरोधात भिडले होते. उत्पन्नाच्या स्रोतांवर चर्चा सुरु असताना समाजवादी पार्टीचे मुस्तकीन डिग्निटी यांनी मालमत्ता कर वसुलीतील ढिसाळपणाचा मुद्दा मांडला होता. एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी मालमत्ता कराव्यतिरिक्त अन्य पर्यायांचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या भूमिकेला इस्लाम पक्षाचे गटनेते खालीद शेख यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यावरून मलिक व शेख या दोघांमध्ये​ वाद निर्माण झाला. दोन्ही नेते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहात गोंधळ उडाला. या राड्यामुळे काही काळ कामकाज थांबवावे लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT