Manmad Dhule Indore Railway Line Latest Update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr Subhash Bhamre: नेत्याच्या सेलिब्रेशनला शल्याची झालर; पराभवानंतर रेल्वे आली रुळावर!

सरकारनामा ब्यूरो

Dhule News: मनमाड-धुळे-इंदूर हा रेल्वे मार्ग धुळे आणि मालेगावकरांच्या दृष्टीने गेली 40 वर्षे चर्चेचा विषय आहे. अनेक खासदारांनी याबाबत निवडणुकीत घोषणा केल्या. विजयी झाल्यावर जोरदार पाठपुरावा केला. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यात दीर्घ कालावधी गेला.सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने १८ हजार ३६ कोटींच्या या रेल्वे मार्गाला तीनशे नऊ किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली.

राजकारणात कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याची पद्धत आहे. भाजपचे डॉ.सुभाष भामरे यांनीही एका प्रकल्पाचे जोरदार सेलिब्रेशन केले. मात्र या सेलिब्रेशनला त्यांच्या नुकत्याच झालेल्या पराभवाच्या शल्याची झालर आहे.

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, प्रताप सोनवणे आणि गेले दहा वर्ष डॉ. सुभाष भामरे या भाजपच्या तीन खासदारांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. सोनवणे यांनी तर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापासून तर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांकडे त्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या.

केंद्रात भाजपचे सरकार असताना धुळे मतदारसंघातून डॉ. भामरे खासदार झाले. ते काही काळ राज्यमंत्री देखील होते. या कालावधीत त्यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. धुळे इंदूर रेल्वेमार्गाच्या या पाठपुराव्यानंतर भूसंपादनाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर पाठपुरावा सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ. भामरे यांचा पराभव झाला.

सध्या काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव येथे खासदार आहेत. केंद्रात भाजपचे सरकार आणि धुळ्यात काँग्रेसचा खासदार अशी राजकीय स्थिती आहे, असे असतानाच सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने १८ हजार ३६ कोटींच्या मनमाड धुळे इंदूर या तीनशे नऊ किलोमीटर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली.

केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी याबाबत भाजपच्या डॉ. भामरे यांचे अभिनंदन देखील केले. त्यानंतर धुळे शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केले. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळण्यात आला.

डॉ. भामरे हे देखील त्यात सहभागी झाले. मात्र या प्रकल्पाचे सेलिब्रेशन करीत असताना डॉ. भामरे माजी खासदार झाले आहेत. प्रकल्प मंजूर झाला तेव्हा काँग्रेसच्या डॉ. बच्छाव खासदार आहेत. डॉ. बच्छाव यांनी देखील हा प्रकल्प मंजूर झाल्याने आनंद व्यक्त केला.

या प्रकल्पला गती मिळावी, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी आपण सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे आणि सरकारकडे पाठपुरावा करू, असे खासदार डॉ. बच्छाव यांनी सांगितले. प्रकल्पाची माहिती मिळाल्यावर माजी खासदार भामरे यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांना दूरध्वनी करून आभार मानले.

हा प्रकल्प मंजूर झाल्याने धुळे जिल्ह्याच्या नागरिकांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी डॉ. भामरे यांचे देखील अभिनंदन केले. आपल्या मतदारसंघात हा महत्त्वाचा प्रकल्प मंजूर झाला. याचा सगळ्यांनाच आनंद आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मनमाड-धुळे- इंदूर या रेल्वे प्रकल्पाची मंजुरी हा एक मोठा राजकीय टप्पा आहे. या टप्प्यावर हा प्रकल्प पोहोचताना अनेक खासदारांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यात महत्त्वाचा वाटा भाजपचे डॉ. भामरे यांचा होता. हे सगळ्यांनाच मान्य करावे लागेल. मात्र हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा ते खासदार म्हणून पराभूत झाले आहेत, या पराभवाचे शल्य त्यांच्या समर्थकांना नक्कीच चुटपुट लावून जाईल. मात्र राजकारणात हे अपरिहार्य असते हे देखील एक वास्तव आहे.

कोणताही मोठा प्रकल्प आणि त्यातही विशेषतः रेल्वे प्रकल्प मंजुरीची प्रदीर्घकाळ प्रक्रिया असते. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. (कै) मधु दंडवते यांचे ते स्वप्न होते. त्यासाठी अनेक वर्ष ते लढा देत आले.केंद्रात १९८९ मध्ये सत्तांतर होऊन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे सरकार आले. त्यात दंडवते रेल्वेमंत्री झाले. त्या कालावधीत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, तेव्हा दंडवते सत्तेत नव्हते. काँग्रेसच्या सरकारने हा प्रकल्प पूर्ण केला.

असा आहे प्रकल्प...

मनमाड-धुळे- इंदूर रेल्वे मार्ग ३०८ किलोमीटर लांबीचा आहे. त्यासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च येईल. पहिल्या टप्प्यासाठी ७०० कोटी रुपये मंजूर झाले आहे. बोरविहीर (धुळे) ते नरडाणा हा पन्नास किलोमीटरचा मार्ग पहिल्या टप्प्यात पूर्ण केला जाईल. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT