Shivaji Maharaj Statue Collapse Controversy: कोणतेही सरकार आपल्या चुका झाकण्यासाठी अन्य कोणाचा तरी बळी देत असते. यामागे जनक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न असतो, मात्र यातून अनेकदा हास्यास्पद प्रकार घडत असतात. महायुती सरकारही याला अपवाद राहिलेले नाही. राज्यातील महायुती सरकार मोठ्या अडचणीत सापडलेले आहे. याला कारण ठरले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याचे.
असे सांगितले जाते ती, की संकटे एकट्याने येत नाहीत, ती समूहाने, एकामागून एक येत असतात. तसाच काहीसा प्रकार महायुती सरकारबाबत घडला आहे. शिवरायांचा पुतळा कोसळला आणि महायुती सरकारच्या अडचणींत भर पडायला सुरुवात झाली. हा पुतळा घाईघाईत उभारण्यात आला का, असे घडले असेल तर त्याचे कारण काय, याची चर्चा गावागावांत सुरू झाली.
शेवटी असा संदेश पसरला किंवा पसरवण्यात आला की, नारायण राणे यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकता यावी, यासाठी अशी घाई करण्यात आली. हे खरे की खोटे, याची पुष्टी झालेली नाही, मात्र लोक एका निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचले की मग सरकारची अडचण होते. सरकारने आपली मान सोडवण्यासाठी आता सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे का, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळला, (Shivaji Maharaj Statue collapse) याला जबाबदार धरूनच जिल्हाधिकाऱ्यांची बदली केली आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे आणि आहे असेही आहे. किशोर तावडे यांची जिल्हाधिकारी म्हणून वर्षभरापूर्वीच नियुक्ती केली होती. वर्षभरातच आणि तेही शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतरच त्यांची बदली करण्यात आली आहे.
पुतळा उभारणीत जिल्हाधिकाऱ्यांची काय भूमिका होती, असा प्रश्न विचारण्याची सोय यानिमित्ताने सरकारने करून ठेवली आहे. शिल्पकार कोण, त्याला काम कुणी दिले, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध लोक एव्हाना घेऊ लागले आहेत. पुतळ्याची उभारणी जिल्हाधिकारी तावडे यांच्या कार्यकाळातच झाली होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तावडे यांच्या कारभारावर माध्यमांच्या समोरच ताशेरे ओढले होते.
शिवरायांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्र अंतर्बाह्य ढवळून निघाला. याची सरकारला कल्पना आली नसेल, असे म्हणता येणार नाही. पुतळा कोसळल्याच्या प्रकरणावर समाजमाध्यमांत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यादरम्यान सत्ताधारी पक्षांचे काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी, काही नेत्यांनी साधलेली चुप्पी समाजमनाला अचंबित करून गेली. शिवरायांवर नेहमी तावातावाने बोलणारे अनेक कार्यकर्ते त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर मात्र शांत राहिल्याचे दिसून आले.
समाजमनाने हा बदल टिपला आहे. गावागावांत याबाबत चर्चा सुरू झाली आहे. हे लक्षात आल्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली. मुख्यमंत्र्यांनी माफी मागणे म्हणजे सरकारने माफी मागणे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही माफी मागितली आहे. तरीही जनमानस अशांत आहे, याची जाणीव सरकारला झालेली आहे.
समाजमाध्यमांची ताकद सरकारला आणि लोकांनाही कळली आहे. पुतळा कोसळला, याचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन काही सत्ताधारी नेत्यांकडून करण्यात आले, मात्र लोकांकडे याचे उत्तर तयार होते.
पुतळा कोसळल्याचे राजकारण करू नये, मग पुतळा उभारल्याचे राजकारण करावे का, असे संदेश समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. महायुती सरकारसाठी हा बाका प्रसंग होता. त्यातच नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचे वागणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्याने आगीत तेल ओतले. पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी घातलेला गोंधळ म्हणजे निव्वळ आक्रस्ताळेपणा होता, असा समज लोकांचा झालेला आहे.
शिक्षणमंत्री केसरकर यांनी जे वक्तव्य केले ते लोक वेडे आहेत, त्यांना काही कळत नाही, असे गृहीत धरून केले की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. केसरकर यांच्या वक्तव्यामुळे समाजात रोष निर्माण झाला.
हल्ली लोक रोष व्यक्त करतानाही काळजी घेत आहेत. कुठे आणि कसा रोष व्यक्त करायचा, हे लोकांना आता कळायला लागले आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रकरणी माफी मागितलेली आहे, तरीही सरकार चिंताग्रस्त दिसत आहे, हे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून समोर आले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.