Jalgaon Political News : भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने खूप संघर्ष केल्यानंतर राज्यात युती शासन आले आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मनोहर जोशी यांनी शपथ घेतली, तर पाटबंधारे, अर्थमंत्री, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, अशी पाच सहा खाती एकनाथ खडसेंच्या वाट्याला आली. त्यावेळी सर्वच मंत्री नवीन व अनुभव नसलेले होते, परंतु मुख्यमंत्री जोशी शिक्षकच असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन अनेक निर्णय घेतले. त्यांच्या हाताखाली आम्हाला खऱ्या अर्थाने शिकायलाच मिळाले, अशा शब्दांत राज्याचे तत्कालीन पाटबांधारे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंनी आठवणींना उजाळा दिला. (Manohar Joshi News)
मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयावर खडसेंनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, कोयना धरणास खालून छिद्र पाडून त्या पाण्याच्या गतिमानावर एक हजार मेगॉवॅटचा वीज प्रकल्प मंजूर करण्यात आला होता, परंतु धरणाच्या खालून छिद्र पाडून वीजनिर्मिती करायची असल्याने कोणी रिस्क घेत नव्हते. हा प्रकल्प फेल गेला तर एवढ्या मोठ्या खर्चाची जबाबदारी घ्यायची कुणी, असा प्रश्न होता. मागच्या सरकारमधेही त्यामुळेच हा निर्णय झाला नव्हता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी ते मला म्हणाले, आपल्याला घरी जायचे आहे का? मात्र मी त्यांना सर्व माहिती सांगितली आणि ते तत्काळ तयार झाले. त्यांनी भांडवलाची तरतूदही केली. पुढे या प्रकल्पाला गती मिळाली आणि धरणाच्या पाण्याच्या गतिमानतेवर तब्बल एक हजार वॅट वीजनिर्मिती करणारा आशियातील पहिला प्रकल्प सुरू झाला. हे केवळ त्यांच्यामुळेच शक्य झाल्याचेही खडसेंनी (Eknath Khadse) स्पष्ट केले.
मुक्ताईनगर नामांतराचे श्रेय त्यांचेच
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी काही प्रमाणात विरोध होत होता. त्यातच आपण जळगाव जिल्ह्यातील एदलाबादचे मुक्ताईनगर (Muktainagar) नामकरण करावे, असा प्रस्ताव जोशी सरांकडे मांडला. त्यावेळी ते म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरास विरोध होतो आहे, त्यातच तुम्ही नवीन आणत आहात. त्यालाही विरोध झाला तर आणखी प्रश्न निर्माण होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर फारच आग्रह केल्यानंतर त्यांनी धाडसाने नामांतर करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर ते मुख्यमंत्री असतानाच एदलाबादचे मुक्ताईनगर हे पहिले नामांतर झाले.
राज्यातील सिंचन वाढवले
सिंचन हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. युती शासन असताना राज्यातील सिंचन वाढवण्यासाठी झालेल्या ठोस निर्णयामुळे आज त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. त्यावेळी आपण पाटबंधारे मंत्री होतो. सिंचनवाढीसाठी तापी खोरे, कृष्णा खोरे, विदर्भ सिंचन व गोदावरी खोरे आणि कोकण विकास सिंचन असे पाच सिंचन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रासह सर्वत्र पाणी दिसून येत आहे.
प्रशासन आणि मंत्र्याचा वाद मिटवला
प्रशासनाकडे एक प्रस्ताव कॅबिनेटकडे आला होता. त्यावेळी त्याला सर्वच मंत्र्यांचा विरोध होता, परंतु प्रशासनाच्या बाजूने मात्र तो लावून धरण्यात येत होता. मंत्र्यांनी नामंजूर केल्यावरही तत्कालीन मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव पुन्हा आणलाच. त्यावेळी आपला व मुख्य सचिवांचा वाद झाला. त्यानंतर सर्वच मंत्र्यांनी मला पाठिंबा देत मुख्य सचिवांना प्रस्ताव मागे घेण्यास सांगितले. प्रशासन आणि मंत्रिमंडळ असे दोन गट त्या प्रस्तावार विभागाले गेले. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मध्यस्थी करून मुख्य सचिवांना समजावले. सर्व मंत्र्यांनाही विश्वासात घेऊन सांगितले. त्यानंतर सामंजस्याने हा प्रस्ताव मागे घेण्यात आला आणि संघर्ष टळला.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.