-संजय परब
Manohar Joshi News : मनोहर जोशी आज आपल्यात नाही. पण कष्ट म्हणा, प्रभावाचा विचार करा किंवा ताकद समजा… या माणसाकडे पदे नेहमी चालूनच आली. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहाच्या राजकारणापासून बाजूला होतील, असे वाटत असताना त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत थेट लोकसभा अध्यक्षपद भूषवण्यापर्यंत मजल मारली!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका साध्या पत्राने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि सरांनी हा आदेश मानत वर्षा निवासस्थान सोडत दादरचे आपले घर गाठले तेसुद्धा साध्या टॅक्सीने. कसलेच दुःख नाही, ज्याने पद दिले, त्याने परत घेतले, हा प्रसंगी निर्विकारपणा त्यांच्या अंगी होता. कदाचित त्यांना तो लहानपणीच्या गरिबीतून आला असावा.
भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करणारा हा एक फाटका माणूस रायगडच्या नांदवीवरून मुंबईत बहिणीकडे आश्रयाला येतो काय आणि मुख्यमंत्रिपद ते लोकसभा अध्यक्षपद स्वीकारतो काय, सर्वच अंचबित करणारे होते. मुख्यमंत्रिपदाचा 1999 मध्ये राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवा, असा आदेश बाळासाहेब यांनी दिला. नाही सांगण्याचा प्रश्न नव्हता.
उभे राहिले आणि उत्तर मध्य मुंबईतून निवडून आले. ही त्यांच्या देशाच्या राजकारणातील एन्ट्री होती. येथे पुन्हा त्यांनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री झाले. खरंतर हे खाते घ्यायला कोणी तयार नसतं. पण, मातोश्री सांगते म्हणताच सर तयार झाले… आणि या फारसे महत्त्व नसलेल्या खात्याला वेगळे महत्त्व मिळवून दिले.
कुठेलेही खाते हे दुय्यम नसते. त्या खात्यावर कोण माणूस आहे आणि त्यांचा दृष्टिकोन काय आहे, यावर त्याचे महत्त्व अवलंबून असते. जोशी यांनी ते दाखवून देत पंतप्रधान वाजपेयी यांची शाबासकी मिळवली. याच दरम्यान लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांचे निधन झाले. हा एनडीए सरकारला अचानक बसलेला धक्का होता. आता काय करायचे : वाजपेयी आणि प्रमोद महाजन एकत्र आले. जोशी यांच्या नावाचा विचार करून ही गोष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या कानावर टाकली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सांगितले : आणि कोण, सर! जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि एका मराठी माणसाला संसदेचे सर्वोच्च पद मिळाले. या पदाची गरीमा वाढवताना सरांनी लोकसभा सभागृहावर नियंत्रण मिळवले आणि पुन्हा एकदा वाजपेयी यांच्या गुड बुकमध्ये स्थान मिळवले. या दरम्यान त्यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र लावण्यासाठी पुढाकार घेतला. सरांनी ज्या ज्या पदाला हात लावला त्याचे सोने केले.
Edited By Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.