Ahmednagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Aarakshan Morcha: मनोज जरांगेंच्या मुक्कामी सभास्थळी मदरशावर फडकले भगवे - हिरवे झेंडे

Pradeep Pendhare

Ahmednagar News: मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे यांची बाराबाभळी (ता.नगर) येथे आज होत असलेल्या मुक्कामी सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. बाराबाभळी येथे मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसाच्या दीडशे एकर जागेत ही मुक्कामी सभा होत आहे.

यानिमित्ताने बाराबाभळीचा परिसर भगवामय झाला आहे. विशेष म्हणजे, मदरशावर हिरवे आणि भगवे झेंडे फडकवले गेले आहेत. इतिहासात नोंद व्हावी, अशी घटना नगरमध्ये घडली आहे. या घटनेची नोंद प्रशासनाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारने देखील घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला 'चलो मुंबई', अशी हाक दिली आहे. जालना जिल्ह्यातून त्यांची आंदोलकांबरोबर पायी पदयात्रा निघाली आहे. ही पदयात्रा नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दाखल झाली आहे. ही पदयात्रा रविवारी संध्याकाळी बाराबाभळी (ता.नगर) येथे दाखल झाली. याचे सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीडशे एकर मैदानात व्यासपीठ, लाऊड स्पीकरच्या कमानी, संपूर्ण मैदानावर सीलबंद पाण्याच्या बाटल्या, तसेच पाथर्डी रोडलगत जेवणाच्या सोयीसाठी राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. तिथे व्हेज बिर्याणीचा भात तयार केला जात आहे. तसेच मसाले भात, पिठले-भाकरी, ठेचा-भाकरी, आमटी-भात, पुलावा, चटणी-चपाती, लोणचे, असे सर्व काही आजूबाजूच्या गावातील मराठा समाजाने बनवून पाठवून दिले आहे.

दीडशे एकर मैदानावर पाण्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मुलभूत सुविधांसाठी पाण्याचे शेकडो टॅंकर आणि फिरते स्वच्छतागृह उभारण्यात आली आहे. मैदनासह संपूर्ण नगर शहराभोवती दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या या लढाईला 'चलो मुंबई'चा नारा दिल्यानंतर मनोज जरांगे यांची ही पदयात्रा नगरमार्गे जाणार होती. या पदयात्रेत सुमारे दहा ते 15 लाख आंदोलक असतील, असे सांगितले गेले. नगरमध्ये मुक्काम होणार असल्याने त्यांच्या नियोजनासाठी मोठे मैदानाची गरज होती. यासाठी मराठा समन्वय समितीला बाराबाभळी येथे मुस्लिम समाजाच्या जामिया मोहम्मदिया मदरसाच्या समोरील दीडशे एकर मैदानाची चाचपणीचा विषय पुढे आला.

मुस्लिम समाजाने यावर लगेचच मैदान देण्याची आणि नियोजनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. जिमाय मोहमंदिया मदरसाचे विश्वस्त मतीन सय्यद यांनी यासाठी पुढाकार घेतला. मैदान उपलब्ध करून देण्याबरोबर मदरसामध्ये असलेले तीनशे मुले स्वयंसेवक म्हणून नियोजनात उतरवले आहेत. ही मुले गेल्या आठवड्याभरापासून मैदानात काम करत आहेत. आज मनोज जरांगे यांची पदयात्रा येणार म्हटल्यावर ती सकाळपासून नियोजनात गुंतली आहे.

मराठा आरक्षणाच्या लढाईचा हा नगरमध्ये ऐतिहासिक मुक्काम आहे. मनोज जरांगे यांची ही येथे मुक्कामी सभा होणार आहे. यानिमित्ताने सकल मराठा समाजाकडून भगवेमय वातावरण निर्माण करण्यात आले आहे. जामिया मोहमंदिया मदरसावर हिरव्याबरोबर भगवे झेंडे फडकवण्यात आले आहेत.

सुमारे 50 ते 70 झेंडे फडकवण्यात आले असतील, असे विश्वस्त मतीन सय्यद यांनी सांगितले. मदरसावर हिरवा आणि भगवा झेंडे एकत्र फडकल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. या घटनेची नोंद प्रशासनामार्फत राज्य आणि केंद्र सरकारने देखील घेतली आहे.

पोलिस अधीक्षकांकडून झेंड्यांची दखल

मदरशावर हिरवा आणि भगवा झेंडा एकत्रित फडकवले गेले आहेत. याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत. तसे समाज माध्यमांवर छायाचित्र व्हायरल होत आहे. याची दखल नगरचे पोलिस अधीक्षक राकोश ओला यांनी घेतली. एकत्रित झेंडे फडकवल्याची मदरसाच्या विश्वस्तांकडून माहिती घेताना पोलिस अधीक्षकांनी समाज माध्यमांद्वारे (व्हाॅट्सअप काॅल) केला.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT