एकीकडे 50 माळ्याच्या पुढे गगनचुंबी इमारती उभारण्यास परवानगी दिल्याने त्या उभ्या राहत असताना त्यातच ठाण्याची अग्निसुरक्षा 'राम' भरोसे असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकाराखाली समोर आली आहे.
आकृतिबंध आराखड्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील मंजूर पदापेक्षा अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये मुख्य अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत. असेच एकूण 835 पदांपैकी 626 पदे रिक्त असल्याने मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या ठाण्यात ही अवस्था असेल तर, राज्यातील इतर शहरांच्या अवस्थेबाबत न बोललेच बरे रे बाबा..! आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा हा मुद्दाही ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट ) डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हीच आकडेवारी ट्विट करून आग नियंत्रणात आणायला माणसेच नाहीत; तर अख्खं ठाणे आगीत खाक व्हायची वाट बघताय काय? असा सवाल उपस्थित करत, ठाणे महापालिका निष्काळजीपण करत असल्याचे म्हटले आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या आता जवळपास 26 लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यातच महापालिका प्रशासनाकडून त्या 26 लाख ठाणेकरांच्या जीवितास धोका असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत समोर आले आहे. मंजूर पदापेक्षा अर्ध्याहून अधिक पदे रिक्त आहेत. हे यावरून स्पष्ट दिसत आहे.
अग्निशमन विभागात 30 ऑक्टोबर 2023 अखेरपर्यंत आकृतीबंध मंजूर करीत असताना 835 पदांना मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात अग्निशमन विभागात सध्याच्या घडीला 209 पदे भरली गेली आहेत. तर 626 पदे आजही रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही मागील दोन वर्षात 150 च्या आसपास कर्मचारी वर्ग सेवा निवृत्त झाला आहे. त्यामुळे ही पोकळी देखील दर महिन्याला वाढताना दिसत आहे.
मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यासह अग्निशमन विभागीय अधिकाऱ्याची 12 पदे मंजूर असताना त्यातील एकच पद भरले गेले असून 11 पदे आजही रिक्त आहेत. सहायक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्याची 56 पदे मंजूर असतांना केवळ 6 पदे भरली गेली असून तब्बल 50 पदे आजही रिक्त आहेत. आग नियंत्रणात आणण्यात महत्त्वाची भूमिका असताना याची जवानांची 450 पदे मंजूर असताना केवळ 90 पदे भरली गेली असून 360 पदे रिक्त आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहर वाढत असताना ठाणे महापालिका हद्दीत केवळ 09 अग्निशमन केंद्र आहेत, त्यात नितीन कंपनी, जवाहरबाग, बाळकुम, मुंब्रा, वागळे, रुस्तमजी, ओवळा, शीळ, कोपरी आदींचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रावर अपुरे मनुष्यबळ असल्याचे दिसत आहे. तर कळवा हॉस्पीटल आणि पारसिक रेतीबंदर येथे बीट फायर स्टेशन सुरू करण्यात आली असून ती खासगी स्वरुपात चालविली जात आहेत. त्याठिकाणी 123 जणांचे मनुष्यबळ असून ते देखील खासगी स्वरुपात असल्याचे दिसत आहे.
लोकसंख्या वाढत असताना आणि शहराचा विस्ताराबरोबर गगनचुंबी इमारती उभ्या राहत असताना अपुऱ्या मनुष्यबळावर अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या तुटपुंज्या फौजेसह अग्निशमन दल आपला गाडा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ही पदे न भरल्यास भविष्यात हा विभागाच रिकामा झाल्याशिवाय राहणार नाही. असे दिसत आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.