Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange on Maratha Reservation : 21 व्या शतकातील पानिपतचा यशस्वी लढा; मराठा आंदोलकांची भावना !

Sampat Devgire

Manoj Jarange Patil News : मराठा आंदोलन मुंबईत शिरल्यास काय स्थिती होईल या दबावाने शासन रात्रभर जागले. मुख्यमंत्र्यांनी बैठकांचा धडाका लावून मराठा आरक्षण आंदोलनाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्याने, हे आंदोलन यशस्वी ठरले, अशा भावना मराठा तरुणांनी, आंदोलकांनी व्यक्त केले आहेत. (Latest Marathi News)

या संदर्भात सकल मराठा समाजाचे समन्वयक नाना बच्छाव यांनी 'सरकारनामा'ला माहिती दिली. बच्छाव सातत्याने जरांगे पाटील यांच्यासोबत होते. ते म्हणाले आंदोलक शनिवारी मुंबईत दाखल होणार होते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आणि त्याआधी लोणावळ्यात सभा झाली. या सभेला उपस्थित जनसामुदाय आणि आंदोलकांच्या भावना लक्षात घेता सबंध पोलिस यंत्रणा सक्रिय होत्या. या बाबत त्यांनी राज्य शासनाला सतत अलर्ट करीत माहिती दिली. आंदोलन मुंबई पोचल्यास अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असती. आंदोलन नवी मुंबईत असतानाच राज्याच्या अन्य भागातून आलेले आंदोलकांनी आझाद मैदान फुल झाले होते. त्याची दखल शासनाला घ्यावी लागली.

काल सायंकाळी आणि दिवसभर शासकीय यंत्रणा मराठा आरक्षण आंदोलनाच्या बाबत अतिशय सक्रिय होऊन काम करीत होत्या याबाबत सातत्याने जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला जात होता. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन बैठका झाल्या यामध्ये सगेसोयरे, ५७ लाख कुणबी नोंदी, दाखले वितरणाची कार्यवाही, आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे कामकाज यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.

अत्यंत जलद गतीने निर्णय होऊन त्याबाबतचे नमुना परिपत्रक जरांगे पाटील यांना दाखविण्यात आले. त्यातील त्रुटी आणि दुरुस्ती याबाबत उच्च न्यायालयातील 22 वकिलांची टीम अभ्यास करून शासनाला सूचना करीत होत्या. कायदेशीरदृष्ट्या हे निर्णय टिकावेत याबाबतची सर्व दक्षता घेण्यात आली होती झालेल्या निर्णयांची माहिती जरांगे पाटील यांनी उपस्थित आंदोलकांना व आंदोलनातील महत्त्वाच्या नेत्यांना देऊन त्यांच्या संमतीनेच याबाबत शासनाला होकार कळविला, असे बच्छाव म्हणाले.

आज सकाळी शासनाचे प्रतिनिधी जरांगे पाटील यांना भेट देणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय होईल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातील विविध टप्पे आणि गेल्या अनेक वर्षात झालेल्या आंदोलनाचे हे फलित असून, या आंदोलनाचा हा आनंदाचा क्षण आहे. सबंध भारतातील लोक या आंदोलनाची दखल घेणार आहेत. मराठा आंदोलकांनी मुंबईत धडकावे याचा दबाव परिणामकारक ठरला या निमित्ताने सतराव्या शतकात झालेल्या देशाच्या हितासाठीच्या पानिपताच्या लढ्यात मराठा सैनिकांनी दाखविलेले संघटन आणि शौर्य याचे चित्र आजच्या आंदोलनातून आमच्या डोळ्यापुढे उभे राहिले, असे बच्छाव म्हणाले.

या आंदोलनात नाशिकचे ही योगदान होते. नाशिककरांनी जमा केलेले अन्नधान्य व साहित्य यावेळी आंदोलकांना वितरित करण्यात आले. नवी मुंबई येथील वाशी बाजार समितीत स्वयंपाक करून आंदोलकांना जेवण देण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते साधनसामग्री घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. आजही आंदोलन यशस्वी झाल्याने या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

सकल मराठा समाजाचे समन्वयक नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, व्यंकटेश मोरे करण गायकर योगेश नाटकर, कैलास खांडबहाले, शिवाजी सहाने, संदीप कुटे, राम निकम, निलेश ठुबे, स्वप्ना राऊत, स्वाती कदम, माधवी पाटील, रोहिणी उखाडे, भारत पिंगळे, निलेश ठुबे, ज्ञानेश्वर सुराशे यांसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सक्रिय होते.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT