Manoj Jarange News : मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीहून मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा अंतिम टप्प्यात आला आहे. गेले पाच - सहा महिने सुरू असलेले आंदोलनाने सरकारला चांगलाच घाम फोडला. आता आरक्षणासाठी जरांगेंच्या एका हाकेवर मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघालेले लाखो मराठा बांधवांचं भगवं वादळ आता नवी मुंबईत धडकलं आहे. जरांगेंनी सगेसोयऱ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला उद्या 11 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. जर सरकारने याबाबत अध्यादेश काढला नाहीतर आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. पण याचवेळी जरांगेंनी वाशीच्या सभेत बोलताना मध्येच साॅरी म्हणाले.
वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शुक्रवारी (ता.26) मोर्चातील मराठा समाजाशी संवाद साधला. या सभेत त्यांनी मराठा आरक्षणाविषयीच्या मागण्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी कालपासून अनेक शिष्टमंडळं पाठवण्यात येत आहेत. त्यांच्याशी त्यांच्या चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्या. त्याबाबतही जरांगे यांनी आपल्या वाशीतील भाषणात सविस्तर सांगितलंच,पण यावेळी त्यांनी आपल्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारने काय मान्य केलं हे सुद्धा वाचून दाखवलं.
मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या सुरुवातीला सरसकट मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी मोठा लढा उभारला आहे. मराठा समाजही जरांगेंच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे. पण आज वाशीतील सभेत बोलताना जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र उच्चारताच साॅरी म्हणाले. आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशा मागणीचा जीआर सरकारने आज रात्रीतच काढावा अशी मागणी केली आहे. सुरुवातीला सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी आग्रही राहिलेल्या जरांगेंनी आता थोडी नरमाईची भूमिका घेतलेली आहे.
जरांगे म्हणाले,आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं आहे. म्हणाले, आम्हाला अध्यादेश हवा आहे.सरकारने उद्या म्हणजे शनिवारी दुपारी 12 पर्यंत अध्यादेश द्यावा,अन्यथा आम्ही मुंबईत घुसणार असल्याचा इशाराही देतानाच त्यांनी उपोषणासाठी किंवा गुलाल उधळायला आझाद मैदानात येणारच अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'54 लाख नोंदी सापडल्या असतील तर त्यांना प्रमाणपत्र वाटप करावे. नोंदी नेमक्या कुणाच्या आहेत, हे माहिती करायचे असेल तर ग्रामपंचायतीला कागदपत्रे द्यावी लागतील. काही जणांनी अर्ज केलेले नाहीत. आता नोंदी मिळाल्याचे माहिती होण्यासाठी गावागावत शिबिरे घ्यावीत. त्या नोंदी ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात करावी. ज्या नोंदी मिळालेल्या लोकांच्या सर्व कुटुंबाला त्याच नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे. त्यासाठी शपथपत्र घ्यावे, त्याची खातरजमा करावी. शपथपत्रासाठी स्टँपपेपर मोफत देण्यासही सरकार तयार आहे,' अशीही माहिती जरांगेंनी दिली.
अंतरवाली सराटीतून मराठ्यांचे (Maratha Reservation) वादळ मुंबईच्या दिशेने निघाले आणि सरकारने आरक्षणासाठी हालचाली वाढवल्या. यामुळे तीन लाखांच्या नोंदी वाढून आता 57 लाख झाल्या आहेत. तर 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आल्याचे सामान्य प्रशासनाच्या सचिवांनी सांगितले. आता सग्यासोयऱ्यांचा अद्यादेश आज रात्रीच काढवा. उद्या सकाळीपर्यंत अध्यादेश आला नाही तर आझाद मैदानावर जाणार. तसेच आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरायचे नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.