Chhagab Bhujbal, Sharad Pawar & Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics: जरांगे पाटील यांना छगन भुजबळांचा खरोखर पराभव करायचा आहे का? काय आहे शंकेचे कारण?

Manoj Jarange Patil: jarange decide Chhagan Bhujbal political victory-छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार यांनी उमेदवारी देण्याबाबत दोन पर्याय ठेवले आहेत.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या पराभवाचा निश्चय केलेल्या शरद पवार आणि मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय झाला नाही. तो जरांगे पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून असेल.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ही त्यांची पाचवी निवडणूक आहे. ही निवडणूक त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी यंदा अतिशय सावध पावले टाकली आहेत.

मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने टार्गेट केले होते. या निमित्ताने त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्याने टीका केली होती. त्यामुळे मंत्री भुजबळ यांचा यंदा पराभव करण्याचा विडा जरांगे पाटील यांनी उचलला होता.

जरांगे पाटील यांना भुजबळ यांच्या मतदारसंघातील निफाड तालुक्याच्या लासलगाव आणि ४६ गावातून मोठा प्रतिसाद आहे. या भागातून चार ते पाच इच्छुकानी उमेदवारीची तयारीही केली होती. मात्र ऐनवेळी यामध्ये एक मत आणि एक धोरण निश्चित होऊ शकले नाही. त्यात नेतृत्व करणाऱ्या समाजातील काही नेत्यांनीच खोडा घातल्याचे बोलले जाते

आता हे सर्व इच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार काय निर्णय घेतात, या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी सर्वाधिकार पवार यांना दिले आहेत. पवार यांनी देखील येवला मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार देण्याबाबत दोन प्लॅन तयार ठेवले आहेत.

येवला मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या सुमारे एक लाख आहे. साडेतीन लाख मतदारांच्या मतदारसंघात एकटा मराठा मतदार भुजबळ यांचा पराभव करू शकत नाही, असा अभ्यास आहे. त्यामुळे या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध ओबीसी हा प्रयोग करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

त्या दृष्टीने कुणाल दराडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. श्री दराडे यांच्या उमेदवारीला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन अपेक्षित आहे. तसे झाले तरच मंत्री भुजबळ यांना आव्हान देता येईल. त्या दृष्टीने कुणाल दराडे यांनी तीन वेळा जरांगे पाटील यांच्याशी संपर्क केला आहे.

शनिवारी या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा देखील झाली. मात्र जरांगे पाटील यांचे याबाबत स्पष्ट धोरण नाही, असे कळते. मंत्री भुजबळ यांच्या विरोधात मराठा उमेदवार देण्याचा जरांगे पाटील यांचा मनोदय आहे. शरद पवार यांना मात्र ओबीसी उमेदवार देऊन मराठा समाजाने त्यांना मदत करावी, असा पर्याय सुचविला आहे.

यामध्ये सध्या जरांगे पाटील यांचा निर्णय घेताना गोंधळ होत असल्याचे दिसते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी निर्णय न घेतल्यास मंत्री भुजबळ यांच्या ते पत्थ्यावर पडणार आहे. सध्या तरी जरांगे यांचे धोरणच भुजबळ यांना लाभदायक ठरेल असे चित्र आहे.

त्यामुळे भावना बाजूला ठेवून राजकीय धोरण आणि आपले ध्येय याचा विचार झाल्यास शरद पवार यांचा प्लॅन भुजबळ यांची कोंडी करू शकतो. तसे न झाल्यास माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पवार यांच्याकडे आहे. हा निर्णय मंत्री भुजबळ यांच्या दृष्टीने फायद्याचा होईल.

यामध्ये भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तरीही त्यांच्या विरोधकांमध्ये मात्र अद्यापही चर्चा चर्वण सुरू आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आपल्या धोरणांतून अप्रत्यक्षरीत्या भुजबळ यांच्या पथ्यावर पडेल असा निर्णय घेता की काय, याची उत्सुकता येवला मतदारसंघात सध्या आहे. त्यामुळे उमेदवार अद्याप स्पष्ट नसल्याने कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT