Manoj Jarange Patil Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांनी केला 'हा' विक्रम, अर्धा दिवस बंद होते नाशिकचे हृदय!

Sampat Devgire

Manoj Jarange Patil Nashik News: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी नाशिकला झाला. यावेळी जरांगे पाटील यांच्या पोटात असह्य कळा येत होत्या. खुर्चीवर बसल्यावर त्या वेदना आणखी वाढत होत्या. या कळा सहन करीत त्यांनी मराठा आरक्षणावर सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा ५६ मिनिटे समाचार घेतला.

जरांगे पाटील यांच्या समारोपाच्या शांतता रॅलीत एक अविस्मरणीय घटना घडली. ती म्हणजे शहराचे हृदय असलेल्या सीबीएस चौक त्यांच्या सभेसाठी अर्धा दिवस बंद होता. गेल्या अनेक वर्षात थेट सीबीएस चौकात सभा घेणारे जरांगे पाटील हे एकमेव नेते ठरले.

विशेष म्हणजे जरांगे यांच्याकडे कुठलेही संवैधानिक पद किंवा दर्जा नाही. मात्र केवळ लाखो युवकांचे समर्थन आणि लोकप्रियतेवर स्वार होत त्यांनी हे करून दाखवले. त्यामुळे हा सबंध शहरासाठी चर्चेचा विषय ठरला.

जरांगे पाटील हे काल पाच किलोमीटरची रॅली करीत सभेच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांच्या पोटात असह्य कळा येत होत्या. पोटाला सर्जिकल बेल्ट लावूनच ते आले होते. सोबत डॉक्टरही होते. भाषण सुरू असताना त्या वाढल्या. त्यांनी बसायला खुर्ची घेतली. मात्र खुर्चीवर बसल्यावर त्या कळा आणखी वाढल्या. त्यामुळे त्यांनी उभ्यानेच भाषण केले.

ते म्हणाले, या उपोषणामुळे मला असंख्य त्रासांना सामोरे जावे लागत आहे. माझी साखर अनियंत्रित झाली आहे. डॉक्टर सातत्याने पोटात इन्सुलिनचे इंजेक्शन देत असतात. वारंवार सलाईन लावावे लागते. त्यामुळे माझ्या संबंध शरीरातील रक्तवाहिन्यांना छिद्रे झाली आहेत.

सलाईन लावण्यासाठी एकदा तर जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेने नस सापडत नसल्याने माझ्या हाडातच सुई टोचली होती. अशा असंख्य वेदना मला आहेत. मात्र मराठा समाजाच्या वेदना त्यापेक्षा कितीतरी अधिक आहेत.

समाजाच्या वेदना दूर करण्यासाठी मी अशा कितीही वेदना झाल्या तरी सहन करीन. मराठा आरक्षणाचा लढा आता कोणत्याही स्थितीत अपूर्ण सोडता येणार नाही. या महाराष्ट्र सरकारची गचांडी पकडून आपण आरक्षण घेऊ आणि नाही दिले तर हे सरकार बदलू.

जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी फडणवीस यांच्या ऐकून आरक्षणा विरोधात बोलणे बंद करावे, असा इशाराही त्यांनी दिला. आमदार प्रवीण दरेकर हे माझ्या विरोधात बोलतात. त्यासाठी त्यांना फडणवीस यांच्याकडून फुस आहे.

मराठा आरक्षणाच्या व्यथा तुम्ही सगळ्यांनीही समजून घ्या. तुम्हाला आरक्षण हवे असेल तर आता वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार करावा लागेल. आजवर पक्ष आणि नेते यांना आपण मोठे केले. त्यातून आपल्या वाट्याला काय आले?.

गेली ४२ वर्ष आरक्षणाच्या नावाने सरकार आपल्याला फसवत आले आहे. आता आपण मोठे होण्याची वेळ आली आहे. तुम्ही सगळ्यांनी पक्ष आणि नेता डोक्यातून काढून टाका मतदान करताना समाजाचा विचार करा. जो आपल्या हिताचा आणि कामाचा त्याला मतदान करण्याची तयारी ठेवावी लागेल.

येत्या २९ ऑगस्टला त्याबाबत आंतरवेली सराटी येथे आपण निर्णय घेऊ. लढायचे की पाडायचे हे त्यावेळी ठरेल. मात्र त्यासाठी राज्यातल्या प्रत्येक गावातील समाज बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी अंतरवेली सराटीला यावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील महायुतीचे सरकार आपल्याला झुलवते आहे. मंत्री शमभुराजे देसाई यांनी एक महिन्याची वेळ मागून घेतली होती. त्यांना आपण दोन महिन्यांची वेळ दिली. मात्र काहीही हालचाल होताना दिसत नाही. एक तर यांना आरक्षण द्यायचे नाही किंवा भारतीय जनता पार्टी ते देऊ देत नाही. कोणतीही स्थिती असली तरी या सरकारला धडा शिकवावाच लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT