Nashik Maratha leaders with Purohit Sangh  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil Strike : दबाव झुगारून नाशिकचे पुरोहित शोधताहेत कुणबी नोंदी!

Sampat Devgire

Maratha Reservation News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य शासनाने कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यात विविध यंत्रणांनी लाखो नोंदी तपासल्या आहेत. याबाबत आता नाशिकचा पुरोहित संघदेखील पुढे आला आहे. त्याची मोठी मदत होण्याची शक्यता आहे. (Nashik Priest had a Historical record of devotees visited at Ramkund)

नाशिक (Nashik) शहरातील पुरोहित संघाच्या रेकॉर्डमध्येदेखील भेट दिलेल्या भाविकांच्या नोंदी आहेत. त्यात राज्य शासनाच्या (Maharashtra Government) सुचनेनुसार मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha) कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यात मदत होण्याची शक्यता आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाच्या कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. त्यात राज्य शासनाच्या विविध यंत्रणा सक्रिय आहेत. याबाबत महसूल विभागाच्या दोन लाखांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्या आहेत. याशिवाय नाशिक महानगरपालिका, विविध नगरपालिका आणि जन्म-मृत्यूच्या नोंदी देखील तपासल्या जात आहेत. त्यातून अतिशय चांगली मदत होत आहे.

शासन निर्णयानुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधणे अत्यंत जिकिरीचे झाले आहे. यासाठी शासन स्तरावर प्रत्येक तालुक्यात तसेच शहरातील तहसीलदार कार्यालयात आपल्या जुन्या नोंदी पाहण्याची सोय करण्यात आली आहे. यासोबतच सकल मराठा समाज नाशिकच्या बैठकीत ठरल्यानुसार विविध पर्याय शोधले जात आहेत.

सकल मराठा समाजाचे पदाधिकारी निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त चंद्रकांत बनकर, राजेंद्र शेळके, योगेश नाटकर- पाटील, अविनाश वाळुंजे यांनी पुरोहित संघाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सतीश शुक्ल यांची सदिच्छा भेट घेतली.

त्यात नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांकडे असलेल्या वंशावळाशी संबंधित नोंदींची सतीश शुक्ल यांनी सविस्तर माहिती दिली. पुरोहित संघाच्या दप्तरातील नोंदी कशाप्रकारे केलेल्या आहेत याचीही संपूर्ण माहिती त्यांनी दिली.

यासंदर्भात कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी ब्राम्हण महासंघ, पुरोहित संघ तसेच सर्व ब्राम्हण संघटना सदैव मदतीस तत्पर असतील असे आश्वासन सतीश शुक्ल यांनी दिल्याने सकल मराठा समाज संघटनेने त्यांचे आभार मानत सत्कार देखील केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT