Chhagan Bhujbal News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : मंत्रिपदाचा कधीच राजीनामा दिलाय; भुजबळांनी जाहीरपणे सांगून टाकलं

Maratha Obc Reservation Chhagan Bhujbal Big Statement : ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी छगन भुजबळांचा मोठा निर्णय...

Pradeep Pendhare

Chhagan Bhujbal Ahmednagar News :

शेवटपर्यंत ओबीसींसाठी लढणार असल्याचे सांगत 16 नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबड येथील 17 नोव्हेंबरच्या ओबीसींच्या रॅलीत गेलो होतो, असा मोठा गौप्यस्फोट ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी नगरमधील एल्गार मेळाव्यात केला आहे. मंत्री भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे यांचे नाव न घेता जोरदार प्रहार केले.

नगरमध्ये OBC समाजाचा आज एल्गार महामेळावा झाला. यात छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर जाहीर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून माझ्या राजीनाम्याची भाषा होत आहे. सरकारविरोधात भुजबळ टीका करत आहेत. भुजबळ यांच्या कंबरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा. हाकलून द्या. मला त्या सगळ्यांना, विरोधी पक्षांतील, स्वपक्षीयांना, स्व सरकारमधील सगळ्यांना सांगायचे आहे, असे म्हणत Chhagan Bhujbal यांनी गौप्यस्फोट केला.

17 नोव्हेंबरला ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे झाली. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो. लाथ मारण्याची मला गरज नाही. अरे, दिला आहे राजीनामा. अडीच महिने झाले. मी शांत बसलो आहे. का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, याची वाच्यता नको. पण माध्यमांतून याबाबत बातम्या येऊ लागल्या. दिलाय राजीनामा, असे सांगून मी ओबीसींसाठी लढा देणार आहे. आणि मनाशी एकच उद्देश ठेवला आहे, "जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम", असे सांगून भाषणाची सांगता मंत्री भुजबळ यांनी केली.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबई, अशी पदयात्रा काढली होती. या यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशी येथे समोरे गेले. तिथे सगेसोयऱ्यांसंदर्भात अधिसूचना काढली. यानंतर मराठा समाजाने राज्यभर एकच जल्लोष केला. मराठा समाजाच्या या अधिसूचनेनंतर मंत्री छगन भुजबळ यांचा आज नगरमध्ये पहिला एल्गार मेळावा होत होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगरमधील मेळाव्यात मंत्री भुजबळ काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सुरुवात केली. 'मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ओबीसींच्या ताटातले ओढल्यास खबरदार', असा इशारा दिला. यावेळी आपला पुढचा लढा ओबीसींसाठी असणार आहे, असे सांगत संघटीतपणे लढा देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन ओबीसींना केले. छगन भुजबळ यांनी तासभर केलेल्या भाषणाच्या शेवटी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करताच 'एकच पर्व, ओबीसी सर्व', अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT