Maratha Reservation News : Manoj Jarange Patil News :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : काय सांगता? भुजबळांचे खंदे समर्थक मनोज जरांगेंसाठी सरसावले; घरोघरी जाऊन...

Manoj Jarange Patil News : भुजबळ यांच्या प्रत्येक निवडणुकीत साथ करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकीय राग बाजूला केला आहे...

संपत देवगिरे, नाशिक

Nashik News : मराठा आरक्षणासाठी आर-पारची लढाई पुकारलेल्या मनोज जरांगे-पाटील यांचे आता राजधानी मुंबईत आंदोलन होणार आहे. यात विशेष बाब म्हणजे येत्या २४ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील भुजबळसमर्थक कार्यकर्तेही सरसावले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळसमर्थक गावा-गावांत जाऊन, घरोघरी धान्य जमा करीत आहेत. प्रत्येक गावातून किमान शंभर युवक आंदोलनासाठी मुंबईला जाणार आहेत. (Latast Marathi News)

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ओबीसीनेते मराठा आरक्षणा विरोधात राज्यभर मेळावे घेत आहेत. मात्र त्यांच्या लासलगाव-येवला मतदारसंघात सकल मराठा समाजाचे युवक गावोगावी जनसंपर्क मेळावे घेत आहेत. या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने भुजबळांचे खंदे समर्थक असलेले नेतेदेखील मराठा आंदोलनासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र आहे.

यासंदर्भात डॉ. सुजित गुंजाळ यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. येवला लासलगाव मतदारसंघात 127 गावे आहेत. या सर्व गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी बैठका होत आहेत. घरोघरी धान्य जमा केले जात आहे. किमान दोन ट्रक भरून धान्य मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेल्या समाजबांधवांसाठी दिले जाणार आहे.

मंत्री भुजबळ ओबीसी आंदोलनासाठी सक्रिय असल्याने त्याचे पडसाद लासलगाव येवला मतदारसंघात उमटलेले दिसतात. यासंदर्भात भुजबळ यांची प्रत्येक निवडणुकीत साथ करणाऱ्या कार्यकर्त्यांनीदेखील यावेळी वेगळा राजकीय राग अडवला आहे. आतापर्यंत प्रत्येक गावात बैठक झाली असून, किमान 600 वाहनांमधून समाजबांधव मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईला जातील, असा दावा डॉ. गुंजाळ यांनी केला आहे.

आंदोलनाच्या तयारीसाठी झालेल्या विविध बैठकांमध्ये शिवसेनेचे नेते संभाजी पवार, जयदत्त होळकर, संजय बनकर, माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी उपसभापती शिवा सुरवसे, ॲड. प्रवीण कदम, डॉक्टर गुंजाळ यांचे विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होऊन मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे मंत्री भुजबळ यांच्याच मतदारसंघात मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची जोरदार हवा तयार झाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT