Milind Narvekar, Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : मिलिंद नार्वेकरांची एकच पोस्ट, अन् भारत- पाक सामन्यावरुन उद्धव ठाकरेंनी उठवलेल्या रानात 'पाणी'

Milind Narvekar On India Pakistan match : उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावरुन केंद्र सरकारविरोधात रान उठवलं. पण नार्वेकरांनी केलेल्या एका पोस्टने त्यांच्या विरोधावर पाणी फिरवलं.

Ganesh Sonawane

India Pakistan match : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानचा भारताने दारुण पराभव केला. भारताची सुरुवात एकदम खराब झाली होती पण तिलक वर्माने नाबाद 69 धावांची अर्धशतकी खेळी केली अन् विजय भारताच्या झोळीत टाकला. या विजयानंतर देशभरातून भारतीय खेळाडूंचे कौतुक होत आहे.

परंतु या सामन्यापूर्वी व त्या दरम्यान झालेल्या घडामोडी पाहाता काहीसं राजकीय वळण या सामन्याला लागलं. भारताने पाकिस्तानसोबत आशिया कपमध्ये एकूण तीन सामने खेळले. परंतु शिवसेना ठाकरे गटाने यावरुन केंद्रसरकारवर टीका केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी बहिष्कार घालावा असं म्हटलं होतं. नुकताच पहलगाम हल्ला झाला आहे, त्यामुळे पाकिस्तानसोबत सामना खेळू नये असं उद्धव ठाकरेंचे म्हणणे होते.

भारतीय संघाने आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत खेळलेल्या तिन्ही सामन्यांमधील एकाही सामन्यामध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले नाही. पहगाम हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय खेळाडूंनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं. मात्र उद्धव ठाकरे यांनी यांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शाह यांचा मुलगा जय शाहच्या हट्टापायी भारतीय संघाला पाकिस्तानसोबत खेळावा लागत असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला होता.

आपण एकीकडे पाकिस्तानवर दहशतवादाचे आरोप करतो आणि नंतर त्यांच्याचसोबत क्रिकेट खेळतो, ही द्विधा भूमिका असून यातून भाजपच्या राष्ट्रभक्तीचं ढोंग उघडं पडल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. तर, भारताचा विजय झाल्यानंतरही संजय राऊत यांनी खेळायलाच नको होते असं म्हटलं होतं. राष्ट्रभक्त नागरिकांनी हा सामना पाहिलाच नाही असं राऊत म्हणाले होते.

परंतु आता उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने केलेली पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. भारताच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकरांना मोह आवरला नाही आणि त्यांनी एक्सवर पोस्ट केली. "हिंदुस्तान जिंदाबाद!" अशी पोस्ट नार्वेकरांनी केली आहे. त्यांच्या या पोस्टने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी सामन्याला स्पष्ट विरोध करुन त्याविरोधात रान उठवलं असताना नार्वेकरांच्या पोस्टने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT