Balasaheb Thorat and Ranjit Singh Deshmukh: Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Milk Price News: राज्यात दुधाच्या दरात घट का झाली ? बाळासाहेब थोरातांच्या जावयांनी सांगितले 'गणित'

Pradeep Pendhare

Ahmednagar News: राज्यात ऊस भाववाढीच्या संघर्षानंतर आता दूध दरवाढीची मागणी सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. नगर जिल्ह्यात देखील दूध दरवाढीसाठी दूध उत्पादक आक्रमक होऊन आंदोलन करत आहेत.

काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे जावई राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दूध आणि दुधाचे उपपदार्थांचे अर्थशास्त्र मांडले आहे. मूळ उत्पादन दूध आहे. परंतु दुधाची दरवाढ ही पावडर आणि बटरच्या दरावर अवलंबून आहे,असे त्यांनी सांगितले.

दुधाच्या दरवाढीसाठी राज्यात आंदोलनं सुरू आहेत. राज्य सरकारने दुधाचा हमीभाव ठरवून दिला आहे. त्यानुसार दूध खरेदी व्हावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करत आहे. याशिवाय दूध उत्पादकांच्या इतर मागण्या देखील आहेत. या आंदोलनामागे दुधाची हमीभावाने खरेदी व्हावी, एवढ्याच मागणीभोवती सर्व घुमत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु मूळ उत्पादन दूध असून देखील त्याचे दर त्यावर ठरत नाही. दुधाचे दर त्यापासून बनवलेल्या उपपदार्थांवर ठरतात. यात प्रामुख्याने पावडर आणि बटरचा समावेश आहे. पूर्वी दुधाचे दर हे दूध पॅकिंग पिशवीवर अवलंबून असायचे. आता ते पावडर आणि बटरकडे सरकले आहेत, असे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

राज्य सरकारने सहा महिन्यापूर्वी दुधाची प्रति लिटर 34 ते 35 रुपयांनी खरेदी करण्याची घोषणा केली होती. याचवेळी पशुखाद्याच्या किंमतीत सुध्दा कपात करण्यात येतील, असे सरकारने जाहीर सांगितले होते. सहकारी दूध संघानी दूध उत्पादकांच्या दुधाला प्रति लिटर 34 ते 35 रुपये दर दिला होता.

त्यावेळी दूध पावडरचे दर प्रति किलो 300 रुपये, बटरचे दर 400 रुपये होते. आज मार्केटमध्ये पावडरचे दर प्रति किलो 200 रुपये, तर बटरचे दर 320 रूपये आहेत. त्यामुळे दुधाचे दर प्रति लिटर 25 ते 26 रुपयांच्या दरम्यान आले आहे, असे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

गणपती उत्सव, नवरात्र उत्सव व दिवाळी सण उत्सवात पूर्वी पावडर व बटरला जेवढी मागणी होती, त्याप्रमाणत यावेळी मागणी नव्हती. पूर्वी 36 ते 37 रुपये रूपये दुधाचे दर असताना पावडर तयार करण्यात आली तिला आता मागणी नाही. ती पावडर तशीच पडून आहेत. सध्याचे पावडरचे दर प्रति किलो 200 रुपये, तर बटर दर 320 रुपयांना विक्री करावी लागते. म्हणजेच आज ती तोट्यात विक्री करावी लागते.

त्यामुळे सर्वच सहकारी व खासगी संघांना देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जागतिक बाजारपेठेत पावडर आणि बटरचे दर वाढले, तरच शेतकरी बांधवांना शासन निर्धारित दर देणे शक्य होईल. याशिवाय दूध व्यवसाय नाशवंत व्यवसाय असल्यामुळे त्यामध्ये सातत्याने अस्थिरता असते. त्यासाठी शासनाने कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेणे गरजचे आहे, असे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले.

(Edited By - Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT