Kopargaon Assembly Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kopargaon Assembly Constituency : अजितदादांच्या डेअरिंगवर आमदार काळे-कोल्हेंच्या मतदार संघात रंगलीय चर्चा...

In Kopargaon Constituency BJP and NCP Ajit Pawars group in the mahayuti is in trouble over the candidacy : अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार आशुतोष काळे यांचं संभाव्य यादीत नाव न आल्यानं कोपरगाव विधानसभा मतदार संघात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अजित पवार यांनी पहिल्या संभाव्य 25 उमेदवारांच्या जागा निश्चितीमध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघातील त्यांचे विश्वासू युवा आमदार आशुतोष काळे यांचं नाव न आल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. या मतदार संघात मित्रपक्ष भाजपचा माजी आमदार असून, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कातील आक्रमक माजी आमदार आहेत.

त्यामुळं तिथं अजितदादांनी डेअरिंग केली नसावी, अशी चर्चा आमदार काळे विरोधकांमध्ये आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या समर्थकांमध्ये रंगली आहे. अजितदादांचा उमेदवार आमदार आशुतोष काळे 'फिक्स' असल्यानं आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करणार असल्यानं, कोपरगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक राजकीय धक्के भाजपलाच बसणार, हे नक्की आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाने संभाव्य 25 उमेदवारांची जागा समोर आली आहे. ही यादी व्हायरल झाल्यानंतर अजितदादांच्या मर्जीतलं आमदार उमेदवार कोण हे पाहण्यासाठी अनेकांनी ही यादी पाहिली. नगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदार संघातील आमदार आशुतोष काळे हे अजितदादांच्या मर्जीतल्या आमदारांपैकी एक! जनसन्मान यात्रेत आमदार काळेंचं अजितदादांनी मतदार संघातील शक्तिप्रदर्शन अजितदादांनी पाहिलं. तरी देखील संभाव्य यादीत नाव न आल्यानं आमदार काळे समर्थक नाराज झालेत. या मतदार संघातील दुसरी बाजू म्हणजे, महायुतीचा पेच आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे इथून भाजपचं प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळं अजितदादांच्या संभाव्य यादीत विद्यमान आमदारांचं नाव आलं नसावं, अशी चर्चा रंगली आहे.

माजी आमदार स्नेहलता कोल्हे अलीकडच्या काळात भाजपमध्ये (BJP) नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून त्या भाजपपासून लांब आहेत. त्यांची नाराजी भाजप नेते महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून त्या मंत्री विखेंवर नाराज आहेत. स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे नगर जिल्ह्यातील राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. मंत्री विखे यांच्याविरोधात त्यांनी काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर मोट बांधली. मंत्री विखे यांना अनेक पातळीवर विवेक कोल्हे यांनी राजकीय धक्के दिलेत.

कोल्हेंच्या भूमिकेमुळं भाजप पेचात

हा राजकीय संघर्षात स्नेहलता कोल्हे भाजपवर नाराज असल्या, तरी त्या जाहीरपणे भाजपपासून लांब गेलेल्या नाहीत. यातच त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून नाशिक शिक्षक विधान परिषद लढवली. दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे मतं घेतली. यानंतर विवेक कोल्हे राज्याच्या राजकारणात उठून समोर आले आणि वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत भरलेत. पुण्यात शरद पवार यांच्याबरोबर विवेक कोल्हे यांचा वाहनातून झालेला प्रवास, त्याचेच द्योतक ठरला. त्यामुळे कोपरगाव मतदार संघात कोल्हे 'तुतारी' हातात घेणार, अशी चर्चा रंगली आहे. परंतु माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवल्यानं भाजपमध्ये राजकीय संभ्रम आहे.

महायुतीत भाजपलाच कोपरगावात धक्के

कोल्हे मायलेकांचं आगामी राजकारण भाजप की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून असेल, याविषयी पेच असल्यानं कोपरगाव विधानसभा मतदार संघाबाबत महायुतीत देखील गोंधळाची स्थिती आहे. यातूनच अजितदादांच्या पहिल्या संभाव्य यादीत आमदार आशुतोष काळे यांचं नाव न आल्याचं सांगितलं जात आहे. कोपरगाव मतदार संघात विधानसभा निवडणुकीत अनेक उलथापालथी होणार आणि त्यातून भाजपलाच धक्के बसणार, असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT