MLA Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Mangesh Chavan: आमदार चव्हाणांनी घेतली शिक्षकांची 'शाळा'; विद्यार्थ्यांना शिकवण्यावरून केली कानउघाडणी

Government Residential School : आमदार चव्हाण यांनी निवासी शाळेत तपासणी केली असता सडलेला कांदा, किडलेली कोबी, सडलेले बीट, खराब तांदूळ आढळून आले.

कैलास शिंदे

Jalgaon News: "सर, तुमचा मुलगा पहिलीत शिकतो, त्याला चांगले इंग्रजी येते. मात्र, तुम्ही ज्यांना शिकवता त्या सहावीतील मुलांना आपल्या आईचे नाव लिहिता येत नाही. काय शिकवता तुम्ही मुलांना, अशा शब्दांत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शासकीय निवासी शाळेतील शिक्षकांची कानउघाडणी केली.

आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील डेराबर्डीजवळ असणाऱ्या शासकीय निवासी शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी त्यांना विदारक चित्र दिसून आले. त्यानंतर चव्हाण यांनी अधिकारी, शिक्षकांची चांगलीच कानउघाडणी केली. आमदार चव्हाण यांनी निवासी शाळेत सर्व तपासणी केली असता सडलेला कांदा, किडलेली कोबी, सडलेले बीट, खराब तांदूळ आढळून आले.

यामुळे आमदार चव्हाण यांनी संताप व्यक्त करत तुम्ही तुमच्या मुलांना अशा भाज्यांचे जेवण द्याल का ? अशी थेट विचारणा केली, तर शिक्षणाचा दर्जाही खालावलेला दिसून आला. दहावीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते, तर सहावीत असलेल्या विद्यार्थ्याला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.

त्यामुळे चव्हाणांनी शिक्षकांना सवाल करत "तुमचा मुलगा पहिलीत शिकतो, त्याला इंग्रजी येते. मात्र, या सहावीत असलेल्या मुलांना साधे आपल्या आईचे नाव लिहिता येत नाही. तुम्ही काय शिकवता मुलांना", असा सवाल त्यांनी केला.

"शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, लाखोंचा पगार देते, पालक मोठ्या अपेक्षेने मुलांना शिकवण्यास पाठवितात. मात्र, मुलांना भोजन नीट नाही, शिक्षण दिले जात नाही, तुम्ही आणि मक्तेदार मिळून या मुलांच्या जीवनाशी खेळ करीत आहात, तुम्ही एका पिढीचे नुकसान करीत आहात. मी ही बाब मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार आहे. जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. मात्र, यापुढे मुलांना चांगले जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील, असंही आमदार चव्हाण म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT