Nashik Political News : Ajit Pawar : Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Political News : सर्व्हे सुरू असताना कशाला उडी मारायची? उमेदवारीबाबत आमदार कोकाटे थेटच बोलले...

Manikrao Kokate On Lok Sabha Candidature : "आरक्षण, धार्मिक वातावरण अशा अनेक घटकांचा परिणाम होणार आहे..."

Arvind Jadhav

Nashik News : "पक्षांकडून होणारे सर्व्हे महत्वाचे आहेत. अगदीच पाच ते सहा संस्था यासाठी काम करतात. त्यामुळे जे सुरू आहे, ते पाहत राहायचे. पक्षांने सांगितले तरच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे अन्यथा लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा मानस नाही," अशी प्रतिक्रिया सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली. मागील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपकडून बंडखोरी करीत कोकाटे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यावेळी त्यांना अपयश आले. यातून धडा घेतलेल्या कोकाटे यांनी यावेळी सावध पवित्रा घेत निवडणूक लढायची तर पक्षाकडून असे स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सिन्नर विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघात येतो. या जागेवरून सध्या महाआघाडीतच रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) एक सर्व्हे केला असून, त्यात शिवसेनेपेक्षा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणे चांगले ठरेल, असा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र शिवसेनेचे इच्छुक आणि जिल्हा प्रमुख विजय कंरजकर यांनी प्रचार सुद्धा सुरू केला आहे. शरद पवार गटाकडून गोकूळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, अशी काही नावे चर्चेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आतापर्यंत जागा निश्चित झालेली नसताना शरद पवार गट आणि ठाकरे गटात जागा आमचीच हे सिद्ध करण्यासाठी चढाओढ लागली आहे. महायुतीकडून ही जागा लढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यात चढाओढ सुरू आहे. भाजपच्या एका सर्व्हेनुसार हेमंत गोडसे यांना मतदारांची यावेळी पसंदी नाही, असा निष्कर्ष काढण्यात आल्याची चर्चा आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात निर्णायकी भूमिका असलेल्या अजित पवार गटाकडून सबुरीचे धोरण आखले गेले आहे. याच परिस्थितीवर बोलताना आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्याची राजकीय परिस्थिती दोलायमान आहे. नाशिकची जागा भाजपकडे जाते की, शिंदे गटाकडे हे अद्याप स्पष्ट नाही. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता नाशिकची जागा अजित पवार गटाकडे सुद्धा जाऊ शकते. जर तसे झाले आणि पक्षाने सांगितले तरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. अन्यथा लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

सगळ्याच पक्षांकडून अगदी चार ते पाच संस्थांकडून स्वतंत्र निरीक्षणे नोंदवून घेतली जातात. आरक्षण, धार्मिक वातावरण अशा अनेक घटकांचा परिणाम होणार आहे. त्याचाही विचार केला जातो. त्यामुळे पक्षाचे आदेश येईल ती पूर्व दिशा अशी स्पष्ट भूमिका कोकाटे यांनी मांडली. दरम्यान, नाशिक लोकसभा मतदार संघात भाजप आणि अजित पवार गटाची सम-समान ताकद आहे.

नाशिक मध्य, पूर्व आणि पश्चिम मध्ये भाजपाचे तर, देवळाली, सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार आहेत. इगतपुरीमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधित्व असले तरी त्यांची अजित पवार गटासोबत असलेली सलगी लपून राहिलेली नाही. माणिकराव कोकाटे यांनी गतवेळी हेमंत गोडसे यांच्याविरोधात बंडखोरी करीत निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. मात्र, याच निवडणुकीतील तयारीच्या जोरावर कोकाटे यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीचा अनुभव, आमदारकी आणि पक्षाची ताकद अशी सर्व पार्श्वभूमी असलेले माणिकराव कोकाटे सध्या अजित पवारांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. यावेळी पक्षाकडूनच निवडणूक लढवयाची, अशी त्यांची भूमिका आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT