Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात रान पेटणार ? आमदार लंके 'तो' मुद्दा अधिवेशनातच नेणार !

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ त्रास देतात, अशी तक्रार आमदार नीलेश लंकेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी सालीमठ काही विशिष्ट लोकांना कामे देण्यासाठी उद्योजकांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. याची दखल घेतली नाही तर हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचा इशारा लंकेंनी दिला. यामुळे प्रशासनाविरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना नगर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे.

आमदार नीलेश लंके यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या कारभाराविषयी तक्रार केली. या तक्रारीचा लंके मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करत आहे. नागपूर येथे ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होत आहे. या तक्रारीची दखल अधिवेशनापूर्वी घेतली नाही, तर हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची तयारी केली आहे, अशी माहिती आमदार लंकेंनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

आमदार लंके म्हणाले, माझी तक्रार खुली आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सुपा एमआयडीसीमधील उद्योजकांना दहा दिवसांपूर्वी बोलावून घेतले. उद्योजकांची तक्रार नाही, मग बोलावले कशाला ? जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांना लोकांचेच ऐकायचे. त्यांच्याच लोकांना कामे द्यायची, असे सांगितले. तसेच हा निरोप वरिष्ठांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे वरिष्ठ कोण ? उद्योजकांच्या बैठकीत खासगी लोक बसवले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून कोणीच तिथे नव्हते. खासगी लोकांचा आणि उद्योजकांचा काय संबंध ? त्यांच्यासमोर उद्योजकांना असे निरोप देणे चुकीचे आहे, याकडेही लंकेंनी लक्ष वेधले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांच्या दारात बसणार

जिल्हाधिकारी यांच्याशी लोकप्रतिनिधी या नात्यानी दूरध्वनीवरून बोलल्याचेही लंकेंनी सांगितले. हा प्रकार चुकीचा आहे. मला माझ्या भागात एमआयडीसी वाढवायची आहे. चुकीचे वागल्यास सर्व उद्योजकांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात घेऊन बसू, असे जिल्हाधिकारी यांना सांगितले. यावरही त्यांनी मनमानी कायम ठेवली.

प्रांताधिकारी यांना कंपनीत पाठवले. तिथे उत्खनन केले म्हणून रॉयल्टीचे हत्यार उपसले. गटातील गटात उत्खनन करायला कोणतीही रॉयल्टी लागत नाही. उद्योजकांची वाहने पकडून आणणे, असे प्रकार दोन वर्षांपासून सुरू आहेत. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख आहे. कोणाच्या सांगण्यावरून त्यांना असे वागणे शोभत नाही, असेही आमदार लंके म्हणाले.

गुंडगिरी मोडून काढली

एमआयडीसी सुरक्षित ठेवण्यासाठी आमचे खूप प्रयत्न सुरू आहेत. 2010 मध्ये मी सरपंच होतो. तेव्हापासून एमआयडीसी पाहत आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही लढतो आहोत. एमआयडीसीत चुकीचा प्रकार होऊ देत नाही. गुंडगिरी, हप्तेखोरी मोडीत काढली आहे. माथाडी अन् युनियन हा प्रकार ठेवलाच नाही. कंपन्यांना बळ दिल्यास रोजगार वाढले, याकडे आपले लक्ष असल्याचे आमदार लंके म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT