MLA Nitin Pawar & Centre minister Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

आमदार नितीन पवार यांनी केंद्रीय मंत्री भारती पवारांचा `करेक्ट` कार्यक्रम केला?

कळवणला आमदार नितीन पवारांनी केंद्रीय मंत्री भावजयीवर केली मात

Sampat Devgire

रवींद्र पगार

कळवण : कळवण नगरपंचायतीची निवडणूक केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी प्रतिष्ठित केल्यामुळे निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता लागून असताना दीर, भावजयीच्या प्रतिष्ठेच्या लढतीत विकासकामांच्या जोरावर आमदार दिराने बाजी मारल्यामुळे महाविकास आघाडीला बहुमताचा कौल मिळाला.

धनशक्ती, जनशक्ती, विकास, नाते- गोते, भाऊबंदकीच्या संशयकल्लोळ वातावरणात अन्‌ निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूने मातब्बर नेते सहभागी झाल्यामुळे निवडणुकीला रंगत आली. केंद्रीय मंत्र्यांनी अडिच वर्षात खासदार झाल्यापासून कळवण शहर व तालुक्यात कुठेही भरीव काम न केल्याने भाजपविषयी मतदारांमध्ये नाराजी होती. निवडणूक टप्प्यात प्रचारावेळी रोड- शो करुन मतदारांना जाहीर सभेतून परिवर्तनाचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी केले. मात्र, मतपेटीतून ते परावर्तीत झाले नाही. आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी कळवण शहर आणि तालुक्यातील विकासकामे मतदारांपुढे ठेवत पायपीट करुन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांना साद घातली. गेल्या पाच वर्षात गटनेते कौतिक पगार यांनी शहराचा केलेला सर्वांगीण विकास मतदारांनी डोळ्यासमोर ठेवून महाराजांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवल्यामुळे मतदारांचे झालेले परिवर्तन बहुमतापर्यंत पोहोचले. चमत्काराच्या भाषेला बगल बसली आणि विकासकामाला साथ दिली.

कळवण नगरपंचायतच्या १७ जागांपैकी ३ जागा बिनविरोध झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या बुलंद झालेल्या हौसल्यांना मतदारांनी भरभक्कम साथ दिल्यामुळे आघाडीने १४ जागांचा आकडा गाठून विरोधकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून आत्मचिंतन करण्यास भाग पाडले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी प्रत्यक्ष निवडणुकीत लक्ष घालून देखील भाजपने १५ जागांवर उमेदवार देऊन लढविल्या. त्यात भाजपच्या एका उमेदवाराने माघार नोंदवल्यामुळे राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली. राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने मतदारांमध्ये चर्चा रंगली. १४ जागांपैकी केवळ २ जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. सुरवातीला विरोधकांनी ही निवडणूक काट्याची लढत होईल, असे भासवले. मात्र, मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहत अपवाद वगळता आघाडीच्या सर्वच उमेदवारांना शंभर ते अडीचशे मतांच्या मोठ्या फरकाने निवडून दिले.

प्रचारयंत्रणा ठरली भक्कम

कळवण शहरासह तालुक्यात कौतिक पगार यांच्या नेतृत्वाचे वेगळे वलय आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराची सारी सूत्रे युवा नेते भूषण पगार यांनी आपल्या हाती घेत केलेले नियोजन, जनतेपुढे विकासाची ठेवलेली वचनपूर्ती, आमदार नितीन पवारांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे चित्रफीत आणि इतर माध्यमातून मतदारांपुढे ठेऊन मतदारांचा विश्‍वास संपादन केला. आघाडीतील सर्वच घटकांना सोबत घेऊन प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी भूषण पगार यांनी आखलेली व्यूहरचना यशस्वी ठरल्याने ‘पडद्यामागील किंगमेकर’ची भूमिका सर्वार्थाने यशस्वी ठरली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT