Rohit Pawar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar News : रोहित पवार लवकरच मोठा धमाका करणार; 'त्या' दोन नेत्यांची नावे सांगणार

Deepak Kulkarni

Ahmednagar News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथे असलेल्या 'बारामती ॲग्रो'च्या 'डिस्टलरी प्लांट'ला नोटीस बजावली होती. तसेच पुढील 72 तासांत हा प्लांट बंद करण्याचे आदेशही नोटिशीद्वारे दिले होते. या आदेशानंतर राजकीय वातावरण तापले होते.

कर्जत - जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या 'बारामती ॲग्रो'च्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत प्रदूषण मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली होती. यावर न्यायालयाने 'बारामती ॲग्रो'च्या प्लांटवर कारवाईला स्थगिती दिली होती. यानंतर आता आमदार रोहित पवारांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) कर्जत येथे मीडियाशी संवाद साधला. त्यांनी बारामती अॅग्रोवरील कारवाईवर मोठं विधान करताना ती राजकीय द्वेषापोटी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ही कारवाई राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला आहे. या दोन नेत्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

आमदार रोहित पवारांना दिलासा...

कर्जत - जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर प्रदुषण महामंडळाने कारवाई केली होती. एक विभाग बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती. या विरोधात आमदार रोहित पवार हे न्यायालयात गेले होते. या अगोदर त्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत दिलासा मिळाला होता. शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली न्यायालयाने प्रदुषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले. त्यात 16 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करु नये. तसेच हा कारखाना कशात दोषी आढळला. याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, सरकारकडे सामान्य जनतेची कामे करण्यासाठी वेळ नाही. मात्र, राजकीय द्वेषातून अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी रात्री दोन वाजेपर्यंत कार्यालय उघडे राहते हे विशेष. या कारवाईबाबत मी नंतर बोलेल, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार काय म्हणाले होते...?

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर (Baramati Agro) झालेल्या कारवाई राजकीय सूडभावनेतून केली आहे. या कारवाईसाठी राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. त्या दोन नेत्यांचे नावे लवकरच जाहीर करणार आहे, पण जे लोक काचेच्या घरात राहतात. त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. वेळ प्रत्येकावर येते, असा इशाराही त्यांनी दिला.

निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) आणि चिन्हावरील सुनावणीवर आमदार रोहित पवारांनी मोठे विधान केले. ते म्हणाले, जेव्हा शिवसेना फुटली आणि शिंदे गटाच्या बाजूने आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात अन्यायकारक निर्णय दिला, तसाच निर्णय जर निवडणूक आयोगाने दिला तर भाजपच्या हातातील बाहुले आहे हे सिद्ध होईल, असं रोहित पवार म्हणाले.

पवार म्हणाले, संविधानाला मनामध्ये ठेवून जर निर्णय झाला, तर शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल. मात्र, संविधानाला धरून निर्णय झाला नाही तर भाजपच्या बाजूने निकाल लागेल, असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT