Satyajeet Tambe
Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajeet Tambe's First Fund : आमदार सत्यजित तांबेंनी महिनाभरातच केली वचनपूर्ती : पहिला निधी कुसुमाग्रजांच्या चरणी अर्पण

Vijaykumar Dudhale

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत निवडून आलेले सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अवघ्या महिनाभरातच वचनपूर्ती केली आहे. आमदार तांबे यांनी आपला पहिला निधी कुसुमाग्रज यांच्या स्मारकाच्या ठिकाणी मराठी भाषा अभ्यास केंद्र स्थापन व्हावे, यासाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच, धुळे, जळगाव व नंदुरबार येथे युवक माहिती केंद्र उभारण्यासाठीही निधी मंजूर केला आहे. (MLA Satyajeet Tambe fulfilled his promise within a month)

आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणुकीच्या प्रचारात काही आश्वासने दिली होती. त्यातील काही पहिल्याच महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न तांबे यांच्याकडून झाला आहे. थोर साहित्यिक कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नाशिकमधील स्मारकामध्ये मराठी भाषा अभ्यास केंद्र व्हावे, यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत तांबे म्हणाले की, या अभ्यास केंद्राच्या उभारणीमुळे कुसुमाग्रजांसारख्या थोर साहित्यिकाचा सन्मान होईल आणि मराठी भाषेच्या संवर्धनात आपण खारीचा का होईना वाटा उचलल्याचे समाधान लाभणार आहे.

धुळे, जळगाव व नंदुरबार येथे युवक माहिती केंद्र

युवक माहिती केंद्रांसंदर्भात तांबे म्हणाले की, युवकांना मार्गदर्शन करणारे, त्यांच्यासाठी असलेल्या संधींची माहिती देणारे एकही सरकारी कार्यालय सध्या राज्यात अस्तित्वात नाही. एकाच छताखाली युवकांना त्यांच्या जीवनाशी निगडीत सर्व माहिती देणारे एक अद्ययावत, आधुनिक युवक माहिती केंद्र प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारण्याची संकल्पना मी निवडणूकीपूर्वी मांडली होती. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांतून एकाच महिन्यात धुळे, जळगाव व नंदुरबार येथे युवक माहिती केंद्र उभारण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच नगर व नाशिक या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर होणार आहे. पुढील ४-५ महिन्यांत उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जागतिक दर्जाचे युवक माहिती केंद्र चालू होतील.

नगरमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र

नगर महापालिकेच्या वतीने नगर शहरातील सावेडी येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचे बांधकाम झाले, मात्र ते केंद्र सुरू होऊ शकलेले नाही. या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून या केंद्राची डागडुजी, आधुनिकीकरण, डिजिटलायजेशन करण्यात येणार असून लवकरच हे केंद्र सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मालेगावमधील पाच उर्दू शाळेसाठी ५० लाखांचा निधी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पाच उर्दू शाळांचे डिजिटलायजेशन करण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काळात नाशिक पदवीधर मतदारसंघातील जास्तीत जास्त शाळांचे डिजिटलायजेशन करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.

शहादामधील वाचनालयासाठी २० लाख रुपये

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेने अद्ययावत असे वाचनालय बांधले होते. परंतु काळानुसार हे वाचनालय डिजिटल होणे, या ठिकाणी अत्याधुनिक पुस्तके असणेही खूप गरजेचे होते. हीच गोष्ट लक्षात घेऊन मी या वाचनालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी व डिजिटलायजेशनसाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. लवकरच शहादा तालुक्यातील सर्व युवक-युवतींना या सुसज्ज वाचनालयाचा लाभ घेता येईल.

अंबडची शाळा 'आदर्श शाळा' करणार

नाशिकमधील अंबड येथील महानगरपालिकेच्या शाळेला 'आदर्श शाळा' बनविण्यासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील सरकारी शाळांसाठी दिशादर्शक ठरेल, अशी एक आदर्श सरकारी शाळा बनविण्यासाठी अंबड येथील महापालिकेच्या शाळेची निवड आपण केली आहे. या शाळेचे आधुनिकीकरण करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही शाळा संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरेल आणि यातून महाराष्ट्रभरातील सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व परिपूर्ण शिक्षणाची दारे खुली होतील, असा विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT