Ahmednagar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात आमदार तांबेंची हजेरी; पण अजितदादांच्या दोन आमदारांची दांडी !

Shasan Aplya dari News : शिर्डी जवळ काकडी परिसरात दिमाखात पार पडलेला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम चांगलाच लक्षवेधी ठरला.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : शिर्डी जवळ काकडी परिसरात दिमाखात पार पडलेला 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम चांगलाच लक्षवेधी ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 'हे सर्व सामान्य जनतेचे सरकार' असल्याचे सांगत विरोधकांवर चांगली फटकेबाजी केली. महायुती सरकार जनतेशी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या कार्यक्रमात महायुतीत नुकतेच सहभागी झालेल्या अजितदादांच्या गटाचे नगरचे आमदार संग्राम जगतात आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांची अनुपस्थिती खटकत होती. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचे भाचे असलेले आणि पदवीधर निवडणुकीमुळे राज्यात चर्चेत आलेले आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती नजरेत भरणारी ठरली.

अजितदादांनी बंड केल्यानंतर सर्वात अगोदर त्यांच्या सोबत गेलेल्या संग्राम जगताप आणि निलेश लंके आज कार्यक्रमास अनुपस्थित दिसले. आपल्या मतदारसंघात लंके व्यस्त असल्याचे समजते. मात्र, जगताप यांच्या अनुपस्थिती बाबत माहिती मिळू शकली नाही. दुसरीकडे अजितदादांसोबत (Ajit Pawar) अगदी शेवटी गेलेले आमदार आशुतोष काळे आणि किरण लहामटे मात्र आवर्जून उपस्थित होते. विशेष म्हणजे काळे आणि लहामटे यांच्या मतदारसंघातील भाजप (BJP) मधील राजकीय विरोधक स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे आणि वैभव पिचड यांनीही उपस्थिती लावत उपमुख्यमंत्री फडणवीस आदींचा पुष्पगुच्छ देत सत्कार केला.

सर्वात लक्षवेधी चर्चा सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीची मुळे दिसून आली. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस (Congress) कडून उमेदवारीच्या घोळात अपक्ष निवडणूक लढवत निवडून आलेले तांबे यांची पक्षीय भूमिका अजूनतरी अस्पष्ट आहे. आपण अपक्ष आमदार असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. नुकतेच जिल्हा काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार सुधीर तांबे यांचे निलंबन मागे घ्यावे असा ठराव केला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमदार सत्यजित तांबे यांची असलेली जवळीक पण महत्वपूर्ण मानली जाते. राज्यात आता तीन पक्षांचे महायुती सरकार असल्याचे कारणे काहीही असोत पण आज काही लोकप्रतिनिधींची उपस्थिती किंवा अनुपस्थितीची चर्चा होणे सहाजिक मानली जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT